अकोला : शिवसेना (Shivsena) नाव आणि चिन्ह याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. तो आता मान्य करावा लागतोय. परंतु, आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध निश्चितपणे दाद मागता येते. तसे उद्धव ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे मला असे निश्चितपणे वाटते आहे की आयोगाचा निर्णय उलटा होईल. त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही उद्धव ठाकरे यांनाच मिळेल, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मांडली.
काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. त्यावर कोणताही परिणाम होणार नाही, तर शिवसेना नाव, चिन्ह असो किंवा नसो आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहोत असे स्पष्ट करत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सध्या उद्धव ठाकरे यांची लीगल टीम चांगली आहे. नावाजलेले वकील आहेत. ते सर्वोच्च न्यायालयात चांगल्या पद्धतीने बाजू मांडतील. त्यामुळे मला काळा कोर्ट घालून कोर्टात बाजू मांडण्यासाठी जाण्याची गरज नाही.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर मला सल्ला मागितला तर निश्चितपणे मी सल्ला देईल. पण सध्या त्यांच्याकडे नामांकित, नावाजलेले वकील आहेत. ते या सर्व घडामोडीवर सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडतील, असा मला विश्वास आहे.