दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसंदर्भातील (Mumbai) याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि भोसले यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत सरकारी वकील शिशिर हिरे यांनी तपासाशी संबंधित विविध बाबी न्यायालयासमोर मांडल्या. दिशाच्या इंक्वेस्ट पंचनाम्यातील नोंदी, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि घटनास्थळाशी संबंधित पुराव्यांवरुन न्यायालयाने सरकारी वकिलांना काही महत्त्वाचे सवाल केले.
सुनावणीदरम्यान दिशाच्या मृतदेहाबाबत हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात तिच्या अंगावर कपडे नसल्याचा उल्लेख असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली. त्यावर मृतदेहावरील कपडे नेमके कोणी काढले आणि संबंधित डॉक्टरांचा जबाब का नोंदवण्यात आला नाही, असा सवाल न्यायालयाने केला. मात्र, हा पंचनामा घटनास्थळाचा नसून हॉस्पिटलमधील असल्याचं सरकारी वकिलांनी स्पष्ट केलं. यावेळी न्यायालयाने सध्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा आपला हेतू नसल्याचं स्पष्ट केलं.
दिशाची हत्या किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला, असा निष्कर्ष काढण्यापेक्षा या प्रकरणात प्रत्यक्षात संशय निर्माण होण्यासारख्या बाबी आहेत का?, हे तपासणं महत्त्वाचं असल्याचं न्यायालयाने नमूद केलं. सरकारी वकिलांनी दिशाच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलमध्ये काढण्यात आलेली काही छायाचित्रंही न्यायालयासमोर सादर केली. यातील एका छायाचित्रात मृतदेहावर कपडे असल्याचं दिसत असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने मृतदेहावरील जखमांबाबतही प्रश्न उपस्थित केले.
दिशा सालियन प्रकरणात मोठा ट्विस्ट; हायकोर्टात नेमकं काय घडलं? आदित्य ठाकरेंवरील आरोप
उंचावरुन पडलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मोठ्या जखमा का दिसत नाहीत आणि केवळ तोंडातून रक्त आल्याचं कसं, असा सवाल न्यायालयाने केला. यावर सरकारी वकिलांनी दिशा खाली पडताना तोंडावर पडली होती, तिच्या कवटीला फ्रॅक्चर झालं होतं आणि जबड्याला गंभीर दुखापत झाली होती, अशी माहिती दिली. शरीराच्या इतर भागांवरही जखमा झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच दिशाचे वडील सतीश सालियन यांचे पोलिसांनी 5 वेळा जबाब नोंदवल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली. जानेवारी 2024 मधील जबाबात त्यांनी मुलीने आर्थिक नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं.
दिशाच्या आई वासंती सालियन यांच्या जबाबाचाही यावेळी उल्लेख करण्यात आला. चर्चेत असलेल्या राजकीय नेत्यांना आणि सेलिब्रिटींना आपण त्यांच्या प्रसिद्धीमुळं ओळखतो, मात्र त्यांचा दिशाशी संपर्क होता की नाही, याबाबत माहिती नसल्याचं सालियन कुटुंबीयांच्या जबाबातून समोर आल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. दिशाचा प्रियकर रोहन राय याच्या जबाबाचाही उल्लेख करण्यात आला. दिशावर तणाव होता आणि दारु प्यायल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचं त्याच्या जबाबात नमूद असल्याचं सांगण्यात आलं. वडिलांसोबत झालेल्या वादानंतर दिशा रोहनकडं राहण्यासाठी आली होती, अशी माहितीही तपासात समोर आल्याचा दावा करण्यात आला. मेडिकल रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचाराच्या खुणा आढळल्या नसल्याचं तसंच पोस्टमार्टम करणारे डॉक्टर कणीराम जाधव यांचा जबाब नोंदवण्यात आल्याचं सरकारी वकिलांनी स्पष्ट केलं.
यानंतर आदित्य ठाकरे यांचे वकील सुदीप पासबोला यांनी युक्तिवाद केला. यापूर्वी रशीद खान पठाण यांनी याच स्वरुपाची याचिका दाखल केली होती, असा दावा त्यांनी केला. त्यावेळी सतीश सालियन यांनी कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती, असंही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. ऐकीव माहितीच्या आधारे गंभीर आरोप करण्यात आले असून या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात आल्याचा युक्तिवाद पासबोला यांनी केला. दिशाच्या वडिलांबद्दल संवेदना असून त्यांच्या मुलीच्या मृत्यूवरुन सुरू असलेलं राजकारण थांबायला हवं, अशी भूमिका त्यांनी मांडली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे.
