महाराष्ट्र केसरीचा अंतिम दिवस, ‘हा’ आहे प्रबळ दावेदार

पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे. हा किताब पटकवण्यासाठी माती विभागातून सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे हे सज्ज झाले आहेत. हे सगळेच पट्टीचे पैलवान असल्याने स्पर्धेत मोठी रंगत पाहायला मिळत आहे. मात्र अत्तापर्यंत झालेल्या एकूण स्पर्धेत सिकंदर शेख हा सगळ्याच पैलवानांना उजवा ठरल्याचे चित्र […]

Kesari

Kesari

पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे. हा किताब पटकवण्यासाठी माती विभागातून सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे हे सज्ज झाले आहेत. हे सगळेच पट्टीचे पैलवान असल्याने स्पर्धेत मोठी रंगत पाहायला मिळत आहे. मात्र अत्तापर्यंत झालेल्या एकूण स्पर्धेत सिकंदर शेख हा सगळ्याच पैलवानांना उजवा ठरल्याचे चित्र असल्याने तो या किताबाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

सिकंदर शेखचा इथपर्यंतचा प्रवास मात्र मोठा खडतर राहिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा हा पैलवान अतिशय गरीब घरातील. वडील रशिद शेख यांना देखील कुस्तीचा भारी नाद. पण घरी अठरा विश्व दारिद्र्य. त्यामुळे रशीद हे निमगावच्या मगरांच्या तालमीत सरावाला असताना तालीमीची स्वच्छता करायची आणि त्या बदल्यात तालमीतील मल्ल जो खुराक देतील तो खायचा आणि सराव करायचे.

कुस्तीतून जिंकलेल्या इनामावर संसाराचा गाडा हाकणे सुरु होते. पुढे सिकंदर आणि हुसेन हे दोन मुलं त्यांना झाली त्यामुळे दोन वेळेच्या खाण्याची भ्रांत झाली. त्यामुळे त्यांनी मार्केट कमिटीत हमालीचे काम सुरु केले. संसार चालवण्यासाठी दिवसभर हमाली करायची तेव्हा कुठे रात्री चूल पेटायची अशा अवस्थेत कुस्तीचा नाद काहीकेल्या सुटत नव्हता. हमाली करून दिवसभर थकलेले रशीद रात्री लहानग्या सिकंदर आणि हुसेनला घेऊन थेट आखाडा गाठायचे अन् कुस्तीचे धडे शिकवायचे. सोबतीला वस्ताद चंदु काळेंचे मार्गदर्शनही मिळत होते.

यातूनच घडलेला सिकंदर हळूहळू जोरदार कुस्त्या मारायला लागला होता. पण संघर्ष लहानपणापासूनच पाचवीला पुजलेल्या सिकंदरच्या रस्त्यात काटे होतेच. सराव सुरु असतानाच सिकंदरचे वडील रशीद यांना आजाराने ग्रासले. त्यामुळे त्यांना हमाली सोडावी लागली. पुन्हा सिकंदराच्या खुराकाची अडचण झाली. पण आपला भाऊ कुस्तीत नाव मोठं करणार याची खात्री असलेल्या मोठा भाऊ हुसनेने वडिलांच्या हमालीचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेतलं.

वडिलांना शक्य न झालेलं स्वप्न घेऊन उराशी बाळगून सिकंदरने आपली घोडदौड सुरूच ठेवली. कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत वस्ताद विश्‍वास हारूगले यांच्या मार्गदर्शनात तो कुस्तीचे डावपेच शिकत होता. पुढे सिकंदरने अनेक मोठ्या कुस्त्या जिंकल्या आणि अलीकडेच तो भारतीय लष्करात भरती झाला आहे. सैन्यदलाकडून खेळत तो अनेक मैदाने जिंकत आहे.

आज महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात मानाची गदा आपल्या खांद्यावर घेऊन वडील आणि भावाच्या खांद्यावरील हमालीच्या ओझ्याचे वजन हलके करण्याची संधी सिकंदरकडे आहे. आणि त्याच इराद्याने तो आखाड्यात उतरणार आहे.

Exit mobile version