The pace of the monsoon has slowed down : देशात दाखल झालेल्या नैऋत्य मान्सूनची गती 6 जूननंतर मंदावली असून, पुढील चार ते पाच दिवसांत तो पुन्हा वेग घेण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल होत असल्याने कोकणात रेंगाळलेला मान्सून लवकरच पुढे सरकेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, रविवारी (14 जून) मान्सूनची उत्तर सीमा 18°N/60°E, 18°N/65°E, 18°N/70°E, हरणाई, सोलापूर, हैदराबाद, भद्राद्री कोथागुडेम, कलिंगपट्टणम, पारादीप, बारीपदा, पुरुलिया, धनबाद, मुझफ्फरपूर आणि 28.3°N/83°E या भागांतून जात आहे. आयएमडीने जारी केलेल्या ताज्या बुलेटिनमध्ये पुढील चार ते पाच दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये तसेच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे म्हटले आहे.
यंदा मान्सूनचे केरळमध्ये आगमन 4 जून रोजी झाले. साधारणपणे केरळमध्ये दाखल झाल्यानंतर सुमारे दहा दिवसांत मान्सून मुंबईसह उत्तर कोकणात पोहोचतो. मुंबईसाठी मान्सून आगमनाची सरासरी तारीख 11 जून मानली जाते. मात्र यंदा ही वाटचाल अपेक्षेपेक्षा संथ ठरली आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनने पश्चिम किनारपट्टीवर वेग घेत कर्नाटक किनारपट्टीवर मुसळधार पाऊस दिला, तर गोव्यातही चांगला पाऊस झाला. 5 जून रोजी तो गोव्यात पोहोचल्यानंतर दक्षिण कोकणात दाखल झाला.
मोठी बातमी : देवदर्शनावरून पिकअप विहिरीत कोसळून 8 भाविक ठार, 6 जण वाचवले
मात्र त्यानंतर त्याची प्रगती मंदावली. सध्या पश्चिम किनारपट्टीवरील मान्सूनची उत्तर सीमा हरणाई परिसरातून जात असून गेल्या चार दिवसांपासून ती त्याच भागात स्थिर आहे. हवामान अभ्यासक अर्थेय शेट्टी यांच्या मते, पश्चिम किनारपट्टीवरील मान्सूनचा प्रवाह अधिक सक्रिय होण्यासाठी बंगालच्या उपसागरात मध्य किंवा उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे आवश्यक असते. मात्र 20 जूनपर्यंत अशी कोणतीही प्रणाली निर्माण होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सूनचे आगमन आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे.
याशिवाय अफगाणिस्तानच्या दिशेने येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाला आहे. या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यानंतर मान्सून पुन्हा वेगाने पुढे सरकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मान्सूनच्या प्रतीक्षेसाठी किमान 20 जूनपर्यंत वाट पाहावी लागू शकते.
