Download App

पंच मारुती सातवांना धमकीचा फोन; ‘महाराष्ट्र केसरी’चा वाद मिटेना

पुणे : ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे पंच असलेले मारुती सातव यांना धमकीचा फोन आला आहे. यासंदर्भात स्पर्धा नियोजन समितीचे अध्यक्ष पै. संदीप उत्तमराव भोंडवे यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

भोंडवे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे की, ’10 ते 14 जानेवारी दरम्यान कोथरूड येथे 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवशी म्हणजे 14 जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता महाराष्ट्र केसरीतील उपांत्य फेरीमध्ये सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड ही कुस्ती झाली.’

‘या कुस्तीमध्ये पंच म्हणून मारुती सातव हे काम पाहत होते. या कुस्तीमध्ये एका डावामध्ये महिंद्र गायकवाडला 4 गुण देण्यात आले. याविरुद्ध शिकंदर शेखच्या कोचने ज्युरी ऑफ अपील म्हणजे थर्ड अंपायरकडे दाद मागितली.’

‘त्यावेळी ज्युरी ऑफ अपील असलेले दिनेश गुंड, नवनाथ ढमाळ व अंकुश वरखडे यांनी अपील केलेल्या डावाचा व्हिडिओ पाहून सिकंदर शेख यास एक पॉईंट व महेंद्र गायकवाड यास 4 पॉईंट देण्यात आले. त्या कुस्तीमध्ये पै. सिकंदर शेखचा पराभव झाला.’

‘त्या कुस्तीत असलेले पंच मारुती सातव यांनी मी स्पर्धा समितीचे अध्यक्ष असल्याकारणाने मला फोन करून संग्राम कांबळेबाबत तक्रार केली व त्याने मला फोन करून धमकी दिल्याची सांगितले व सदर व्यक्तीपासून आमच्या जीवितास धोका असल्याचे सांगितले.

‘तसेच, संग्राम कांबळे यांनी सदर संभाषण हे सोशल मीडियावर प्रसारित करून स्वतःच्या रिवाल्वरमध्ये गोळ्या भरत असल्याचा व्हिडिओ प्रसारित केला असल्याचे सांगितले.त्या कुस्तीत ज्युरी म्हणून असलेले दिनेश गुंड यांनीही ते संभाषण सोशल मीडियावर ऐकलं व मला फोन करून माझ्याकडे संग्राम कांबळे बाबत तक्रार केली.’

‘पंच मारुती सातव व दिनेश गुंड यांनी स्पर्धा समितीकडे संग्राम कांबळेबाबत तक्रार केली असून त्या अनुषंगाने मी आपल्याकडे तक्रार करत आहे. तरी पंच मारुती सातव व ज्युरी दिनेश गुंड यांना संरक्षण देऊन संग्राम कांबळेबाबत योग्य तो तपास करावा.’ अशी विनंती भोंडवे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.’

नुकतीच पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा संपन्न झाली आहे. या स्पर्धेत नांदेडच्या शिवराज राक्षेंनी सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाडचा पराभव करत महाराष्ट्र केसरीचा मान किताब पटकावला. मात्र, उपांत्य फेरीत पैलवान महेंद्र गायकवाड आणि वाशिमचा पैलवान सिकंदर शेख यांच्यात झालेल्या लढतीची चर्चा जास्त होत आहे.

या लढतीमध्ये पै. सिकंदर शेखवर पंचानी दिलेल्या निर्णयामुळे अन्याय झाल्याचे खुद्द सिकंदरसह अनेकांनी बोलून दाखवले आहे. स्पर्धा होऊन दोन दिवस उलटले तरीही यावरून वाद काही थांबतांना दिसत नाही.

Tags

follow us