Toxic Liqor Case Pune : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणानंतर पुणे पोलीस आयुक्तालयाने मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या प्रकरणात कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्यासह हडपसर चौकी प्रमुख हसीना शिकलगार आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक हसम मुलाणी यांना निलंबित करण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई करत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
21 मे 2026 रोजी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी अथवा विषारी दारू सेवनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. मृतांचा आकडा वाढत असताना अनेक जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे अवैध दारू व्यवसायाचे जाळे किती खोलवर रुजले आहे, याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान संबंधित भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू निर्मिती आणि विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या अवैध धंद्यांबाबत स्थानिक पोलिसांना पूर्वीपासून माहिती असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यावर प्रभावी आणि कठोर कारवाई करण्यात अपयश आल्याचा ठपका संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, या घटनेमुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडून अपेक्षित असलेली दक्षता आणि देखरेख या प्रकरणात दिसून आली नाही. परिणामी, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि जबाबदारीवर जनमानसात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्तव्यातील निष्काळजीपणा, हलगर्जीपणा तसेच नियंत्रण आणि देखरेखीतील त्रुटींचा गंभीरपणे विचार करून ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.
मोठी बातमी : तुकाराम मुंढेंचा रामदेवबाबांच्या पतंजलीला दणका ! राज्यभरात 73 लाखांची औषधे जप्त
मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 25 तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालय राहणार असून वरिष्ठांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालयाची हद्द सोडता येणार नाही. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून अवैध दारू निर्मिती, पुरवठा आणि विक्री साखळीत सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वारंवार तक्रारी आणि माहिती मिळूनही अवैध धंद्यांवर वेळीच कारवाई का झाली नाही, असा सवाल सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून उपस्थित केला जात आहे. विषारी दारूमुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याने दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयाने जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करत पोलीस दलात शिस्त आणि उत्तरदायित्वाला प्राधान्य दिल्याचा संदेश दिला आहे. विषारी दारू प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
