मुंबई : राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. राज्याचे नवे राज्यपाल (Governor ) म्हणून रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान बैस यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. नवे राज्यपाल ‘बैस आहेत की ‘बायस’ हे येणारा काळ ठरवेल, अशा शब्दात राऊत यांनी एकप्रकारे नव्या राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
नवीन राज्यपाल भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत – Jayant Patil
खासदार संजय राऊत हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, नुकतेच राज्याला नवीन राज्यपाल मिळाले आहेत. त्यांच्या नावात बैस आहे की बायस आहे हे माहीत नाही. त्यांनी जर घटेनुसार काम केलं तर महाराष्ट्रात त्यांचं स्वागत होईल. मी त्यांना व्यक्तीश: ओळखतो. ते सुस्वभावी आहेत. त्यामुळे त्यांचं स्वागतच आहे. परंतु, त्यांनी घटनेनुसार काम करावं, राजभवनाचं भाजपा मुख्यालय बनवू नये, असा इशारा देखील यावेळी राऊत यांनी नव्या राज्यपालांना दिला आहे.
कोश्यारींवर टीका…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात भाजपचे एजंट म्हणून काम केले. ते काम घटनाबाह्य होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्यं केली. तेव्हापासूनच कोश्यारी यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली जात होती. परंतु, भाजपने कोश्यारी यांचा कार्यकाळ संपेपर्यंत त्यांना पाठिशी घातले. अखेर आज त्यांचा राजीनामा मंजूर झाल्याचे राऊत म्हणाले.
महाराष्ट्राच्या राज्यपालांविरोधात राज्याच्या जनतेने पहिल्यांदाच एवढा आक्रमक पवित्रा घेतला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात लोक रस्त्यावर उतरले. महाविकास आघाडीचे सरकार असताना 12 आमदारांच्या नावाची यादी त्यांनी मंजूर केली नव्हती. मात्र यात त्यांचा दोष नाही. व्यक्ती वाईट नसते. मात्र त्यांना दबावाखाली काम करावे लागते तेव्हा त्यांचा भगतसिंह कोश्यारी होतो, अशा शब्दात राऊत यांनी कोश्यारी यांना शाब्दिक टोला लगावला.