Tuljabhavani Temple Pujari Dispute: तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव (Navratri) अवघ्या काही दिवसांवर आला असताना तुळजापूर मंदिरातील पुजाऱ्यांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. पुजाऱ्यांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्याच्या मुद्द्यावरून भोपे आणि पाळीकर पुजारी मंडळ आमनेसामने आले आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात येत असून, या वादामुळे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील वातावरण तापले आहे.
भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी पाळीकर पुजारी मंडळावर आरोप करताना, बायोमेट्रिक ओळखपत्राच्या माध्यमातून कथित बोगस पुजाऱ्यांना मान्यता देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाकडून मिळणाऱ्या सक्सेशन सर्टिफिकेटकडे मंदिर प्रशासनाचे वकील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. यामुळे काही जण कथितरित्या सर्टिफिकेट मिळवून बायोमेट्रिक ओळखपत्र मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
संघर्ष बाहेरच्या अन्यायाविरुद्ध असू द्या; आपसात नाही; धानोरकर-वडेट्टीवार यांच्यामधील वाद मिटला
अमरराजे कदम यांनी पुढे पाळीकर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांच्यावरही गंभीर आरोप केले. गंगणे यांनी मंदिराच्या वकिलाला हाताशी धरून कथित बोगस पुजाऱ्यांकडून पैसे घेऊन प्रमाणपत्र दिल्याचा दावा कदम यांनी केला. तसेच 1912 मध्ये तत्कालीन निझाम संस्थानाने पत्र क्रमांक 438 द्वारे पाळीकर पुजारी मंडळाला पुजारी मानले नसल्याचेही त्यांनी म्हटले.
दुसरीकडे, पाळीकर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी भोपे पुजारी मंडळाचे आरोप फेटाळले आहेत. मंदिर संस्थानचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी आणि विश्वस्त मंडळाने तुळजापूरमधील सर्व पुजाऱ्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर आक्षेप असल्यास भोपे पुजारी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे गंगणे यांनी म्हटले.
गंगणे यांनी अमरराजे कदम यांच्यावरही पलटवार केला. गेल्या 30 वर्षांमध्ये मंदिराशी संबंधित अनेक कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली असून, त्यामध्ये अमरराजे कदम सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, भोपे आणि पाळीकर पुजारी मंडळातील या आरोप-प्रत्यारोपांवर तुळजाभवानी मंदिर संस्थानने अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. नवरात्रोत्सव तोंडावर असताना बायोमेट्रिक ओळखपत्रांचा मुद्दा आता पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
