Download App

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये पुन्हा दोन गटांकडून यात्रेत दगडफेक, दहा जण जखमी

Two groups roared in Ahmednagar : नगर तालुक्यातील जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रोत्सवाला शेवटच्या दिवशी रविवार 7 मे ला झालेल्या दंगलीमुळे गालबोट लागले आहे. यात्रोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणून महिला, लहान मुले व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रहाटगाडग्याजवळ मुस्लिम व हिंदू समाजाच्या मुलांमध्ये सायंकाळी आठच्या सुमारास शाब्दिक चकमक झाल्याची माहिती नागरिकांकडून मिळाली. यानंतर दोन्ही गटाकडून दगडफेक झाल्याचे समजते.

यात्रेतील खेळण्याची दुकाने तसेच यात्रेत जमलेल्या नागरिक, महिला यांच्यावर सुमारे अर्धा तास दगडफेक सुरू होती. अचानक दगडफेक सुरू झाल्याने यात्रेत सर्वत्र पळापळ सुरू झाली. यामध्ये खेळण्याचे दुकानदार असलेल्या महिला व लहान मुले जखमी झाले. तसेच काही ग्रामस्थांनाही दगड लागल्याने जखमी झाले आहेत. एकूण दहा जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गोरख बनकर यांना डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मणिपूर हिंसाचार : मराठी विद्यार्थ्यांसाठी शिंदे-पवारांनी पाऊलं उचलली, 14 विद्यार्थी…

यात्रेत झालेल्या दगडफेकीने अनेक महिला तसेच लहान बालके यात्रेतच अडकून पडले होते. तर अनेक लहान मुले पालकांपासून विभक्त झाल्याने लहान मुले व आई-वडील धायमोकलून रडत होते. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ध्वनिक्षेपकावरून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत होते. परंतु परिस्थिती खूप भयानक व भितीदायक बनली होती. सर्वत्र नागरिक सैरावैरा धावत होते. एका गटाकडून सुमारे 100 ते 200 लोकांचा घोळका अंधारातून यात्रेकरूंवर दगडफेक करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

जेऊरगावात बाजारपेठेत दगडांचा मोठा खच पडला होता. या दंगल प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. जेऊर गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गावात दंगल झाल्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गावामध्ये तणावपूर्ण वातावरण तयार झालेले आहे.

Tags

follow us