Ladki Bahin Yojana February Installment Date : विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत (Mukhyamantri Ladki Bahin Scheme) रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या योजनेत अनेक अपात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याचे लक्षात आल्यानंतर पडताळणी मोहीम सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात पाच लाख महिला अपात्र ठरल्या. त्यानंतर आता आणखी दोन लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्याच्या आतच या बहिणींची नावे लाभार्थी यादीतून बाद होतील अशी शक्यता आहे. अर्ज पडताळणीत चारचाकी वाहन, टॅक्स भरणा करणाऱ्या महिला, जमीन असणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या आधी जुलै 2024 मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. योजनेसाठी काही निकषही ठरवण्यात आले होते. मात्र सरकारी यंत्रणांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येऊन सुरुवातीच्या काळात सरसकट अर्ज मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. इतक्या लाभार्थ्यांना दर महिन्याला दीड हजार रुपये देताना सरकारची तिजोरी रिकामी होऊ लागली. अन्य योजनांवरही ताण यायला गेला.
लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना मिळाले 450 कोटी; धक्कादायक माहिती उघड..
या गोष्टी लक्षात आल्याने सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची निकषांनुसार पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला चारचाकी वाहने असणाऱ्या महिलांचे नावे वगळण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला आणि अन्य निकषांनुसार पडताळणी सुरू करण्यात आली. तर दुसरीकडे अपात्र असल्याचे लक्षात येताच महिला स्वतःहून या योजनेतून माघार घेऊ लागल्या आहेत. त्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आता वेगाने कमी होऊ लागली आहे. पडताळणी मोहीम सुरुच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्य सरकारने आता फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याची तयारी सुरू केली आहे. अद्याप हा हप्ता जमा झालेला नाही. राज्यभरात सुरू असलेल्या छाननीनंतर कदाचित निधी खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात हा निधी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. कदाचित यामध्ये आणखी बदलही होऊ शकतो. ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत त्यांचा अर्ज बाद केलेला असेल.
मोठी बातमी! ५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले, वाचा नेमकी कारणे काय?