लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना मिळाले 450 कोटी; धक्कादायक माहिती उघड..
![लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना मिळाले 450 कोटी; धक्कादायक माहिती उघड.. लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना मिळाले 450 कोटी; धक्कादायक माहिती उघड..](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/01/ladki-bahin-yojana-4_V_jpg--1280x720-4g.webp)
Mukhyamantri Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेत राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. या योजनेबाबत गोंधळाचं वातावरणही कायम आहे. ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेतून वगळलं जाणार आहे. यासाठी पडताळणी सुरू झाली आहे. यानंतर कागदपत्रे आणि अन्य महत्वाच्या निकषांवर तपासणी होणार आहे. तर दुसरीकडे या योजनेतून पाच लाख लाभार्थी कमी झाले आहेत. यावर विरोधी पक्षांनी आक्रमक होत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
आता योजनेची दुसरी बाजू समोर आली आहे. या योजनेत अपात्र महिलांना आतापर्यंत किती निधी वाटप करण्यात आला याची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. या पाच लाख अपात्र महिलांना 450 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अर्थात त्यांच्याकडून ही रक्कम परत घेतली जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले होते. त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.
मोठी बातमी! ५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले, वाचा नेमकी कारणे काय?
विधानसभा निवडणुकीच्या आधी जुलै महिन्यात ही योजना सुरू झाली. या योजनेसाठी एकूण 2.46 कोटी महिलांना लाभ देण्यात आले. दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत होते. परंतु, जानेवारी महिन्यापासून योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीचे काम हाती घेण्यात आले. अर्जांची छाननी सुरू करण्यात आली. यात पाच लाख महिला अपात्र ठरल्या. या महिलांना जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांचे हप्ते देण्यात आले. ही रक्कम 450 कोटी रुपये होते. ही रक्कम परत घेणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
आता या अपात्र ठरलेल्या महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत. अपात्र महिलांकडून पैशांची वसुली करणे योग्य होणार नाही असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ही रक्कम आता राज्य सरकारच्या तिजोरीत परत येणार नाही. या योजनेत सध्या चारचाकी वाहने असणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. अनेक महिला स्वतःहून लाभ नाकारत आहेत. तसेच या पडताळणीनंतर लाभार्थ्यांची कागदपत्रे, उत्पन्न या टप्पांवरही पडताळणी होणार आहे. त्यामुळे आगामी काळात योजनेतून आणखी लाभार्थी वगळले जाण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेतून लाखो लाभार्थी पडणार बाहेर, सरकारची तयारी; घेतला ‘हा’ निर्णय