मुंबई-ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना बढतीचा ‘डबल धमाका’; दुबेरे आणि देवेन भारती महासंचालक श्रेणीत

Maharashtra IPS Officers Promotion : आभूषण दुबेरे आणि देवेन भारती यांना पोलीस महासंचालक श्रेणीत पदोन्नती देण्याचा शासनाचा आदेश जारी झाला आहे.

News Photo   2026 11 20T220308.671

Maharashtra IPS Officers Promotion

Maharashtra IPS Officers Promotion : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलीस दलातील 2 वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक (DGP) श्रेणीत पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील शासन आदेश 20 नोव्हेंबर 2026 रोजी जारी करण्यात आला. अपर पोलीस महासंचालक श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या 2026 च्या निवडसूचीत समावेश असलेल्या या अधिकाऱ्यांना पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे.

शासनाच्या आदेशानुसार, आभूषण दुबेरे आणि देवेन भारती यांना पोलीस महासंचालक श्रेणीत पदोन्नती देण्यात आली आहे. आभूषण दुबेरे हे ठाणे शहर पोलीस आयुक्तपदाची, तर देवेन भारती हे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांना सध्याची पदस्थापना कायम ठेवून पदोन्नती देण्यात आली आहे.

या पदोन्नतीला ‘इन-सिटू प्रमोशन’ असे म्हटले जाते. म्हणजेच संबंधित अधिकाऱ्यांच्या सध्याच्या पदावर कोणताही बदल न करता त्यांना उच्च श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे आभूषण दुबेरे आणि देवेन भारती हे दोघेही आपापल्या सध्याच्या पदावर कायम राहणार असून, त्यांना महासंचालक श्रेणीचा दर्जा मिळणार आहे.

पोलीस भरतीतील तरुणींसाठी मोठा दिलासा, तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ; जाणून घ्या कारण

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 22न (2) मधील तरतुदींनुसार आणि सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला आहे. गृह विभागाचे शासन सहसचिव सुग्रीव संभाजी धपाटे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरही हा शासन आदेश उपलब्ध करून देण्यात आला आहे.

राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. विशेष म्हणजे, पदोन्नतीनंतरही दोन्ही अधिकाऱ्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ठाणे आणि मुंबई पोलीस आयुक्तालयांचे नेतृत्व पूर्वीप्रमाणेच आभूषण दुबेरे आणि देवेन भारती यांच्याकडे कायम राहणार आहे.

Exit mobile version