UBT Rebel Leader’s June Month & Sanjay Name Connection : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून, पक्षाचे सहा खासदार बंडखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. पक्षाने व्हीप जारी करूनही या सहा खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, या बंडखोरीत एक अजब योगायोग समोर आला आहे, जो राजकीय विश्लेषकांनाही थक्क करून सोडणारा आहे तो म्हणजे ‘जून’ महिना आणि नावातील ‘संजय’ या शब्दाचा असलेला दरारा.
‘जून’ महिना पुन्हा एकदा संकट घेऊन आला
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘जून’ महिना कायमच कठीण काळ ठरला आहे. कराण जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक बंडखोरी करून शिवसेनेला आणि सत्तेला हादरा दिला होता. आता पुन्हा एकदा जून 2026 मध्ये उद्धव ठाकरेंच्या नऊपैकी सहा खासदारांनी बंडाचे हत्यार उपसले आहे. योगायोगाने जून महिनाच शिवसेनेच्या दुभंगण्याचे निमित्त ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तीन संजय गेले, दोन संजय उरले…
शिंदेंच्या बंडातील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे ‘संजय’ नावाचे नेते. एकनाथ शिंदेंच्या पहिल्या बंडातही संजय शिरसाट, संजय राठोड आणि संजय गायकवाड हे तीन संजय ठाकरे गटातून बाहेर पडले होते. आता पुन्हा एकदा हाच इतिहास घडला आहे. सध्याच्या सहा बंडखोर खासदारांच्या यादीतही संजय जाधव, संजय देशमुख आणि संजय दिना पाटील असे पुन्हा तीन ‘संजय’ आहेत.
पुढचं लक्ष्य आमदार?
राजकीय वर्तुळात आणखी एक चर्चा रंगू लागली आहे. खासदारांनंतर पुढील लक्ष्य ठाकरे गटाचे आमदार असू शकतात, असा दावा काही नेते करत आहेत. सध्या ठाकरे गटाकडे सुमारे 20 आमदार आहेत. या यादीत संजय देरकर आणि संजय पोतनीस अशी दोन नावे असल्याने “संजय फॅक्टर”ची चर्चा आणखी रंगत आहे. अर्थात, याला कोणताही ठोस राजकीय आधार नसून हा निव्वळ योगायोग असल्याचे जाणकारांचे मत आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतीकं, संकेत आणि योगायोग यांनाही महत्त्व दिले जाते.
‘महाभारता’चा तो संदर्भ…
महाभारतात संजय हा धृतराष्ट्रचा सारथी आणि डोळस डोळ्यांनी युद्ध पाहणारा होता. पण उद्धव ठाकरेंच्या ‘महाभारतात’ मात्र हे ‘संजय’ सारथी होण्याऐवजी, पक्षाची साथ सोडून निघाले आहेत. रवी राणांसारख्या नेत्यांनी तर, “भविष्यात शिवसेनेत फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊतच उरतील,” असे भाकीत करून या चर्चेत अधिकच तेल ओतले आहे.
योगायोग की राजकीय वास्तव?
राजकारणात आकडेमोड, रणनीती आणि सत्तासमीकरणे महत्त्वाची असली तरी अनेकदा काही योगायोग चर्चेचा विषय बनतात. जून महिन्यातील बंडखोरी आणि त्यात वारंवार समोर येणारे ‘संजय’ हे नाव हा त्यापैकीच एक भाग आहे. सध्या मात्र उद्धव ठाकरे यांच्यासमोरचा खरा प्रश्न योगायोगांचा नाही, तर पक्षाची ताकद टिकवून ठेवण्याचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे बंडखोर खासदार सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. २१ जून रोजी या खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश होण्याची दाट शक्यता असून, त्यासाठी एका भव्य कार्यक्रमाची तयारी सुरू असल्याचे समजते. जून महिन्याची धग आणि ‘संजय’ नावाची ही साखळी उद्धव ठाकरेंसाठी खरोखरच राजकीय ग्रहण ठरणार आहे, की यातून मार्ग काढत ते पुन्हा एकदा पक्ष उभा करतील? याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
