Uddhav Thackeray criticizes the Modi government : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिनंदन मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे कौतुक करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. दोन्ही नेत्यांनी हा विजय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा असल्याचे सांगत पेपरफुटी प्रकरणात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली.
मोर्चाला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, आजचा दिवस भाषण करण्याचा नाही. हा दिवस देशभरातील विद्यार्थ्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाच्या यशाचा आहे. तुम्ही जे आंदोलन उभं केलं, ते देशभर पेटलं आणि अखेर त्याला यश मिळालं. त्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आज आपण सर्व येथे एकत्र आलो आहोत. यावेळी त्यांनी नव्या पिढीच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. या देशातील जेन-झी पिढी सरकारच्या झिंज्या कशा उपटू शकते, हे या आंदोलनाने दाखवून दिलं. तरुणांच्या एकजुटीसमोर कोणतीही सत्ता टिकू शकत नाही, हे देशाने पाहिलं, असे राज ठाकरे म्हणाले.
मात्र विजयाचा उत्सव साजरा करताना आंदोलनाच्या काळात घडलेल्या दुर्दैवी घटनांचा विसर पडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. पेपरफुटी प्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या 21 विद्यार्थ्यांची नावे व्यासपीठावरून घेत राज ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या आंदोलनाला यश आलं, याचा आनंद नक्कीच साजरा झाला पाहिजे. पण या लढ्यात जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांना विसरून चालणार नाही. त्यांच्या स्मरणार्थ आपण एक मिनिट मौन पाळूया, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर संपूर्ण मैदानात उपस्थित हजारो कार्यकर्ते आणि विद्यार्थी शांत उभे राहिले.
मोदींसारखे लोक झुकवले की हिटलरला झुकवल्याचा आनंद मिळतो; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात
राज ठाकरे यांनी मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याबद्दल मुंबई पोलिसांचेही आभार मानले. आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या सहकार्याचे त्यांनी कौतुक केले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केंद्र सरकार आणि भाजपवर तीव्र शब्दांत टीका केली. आज मी फक्त तुमचं अभिनंदन करत नाही, तर देशभरातील सर्व देशभक्तांना अभिवादन करत आहे. आज कोणतीही निवडणूक जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले आहेत, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी हा संघर्ष केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्यापुरता मर्यादित नसल्याचे सांगितले. हा संघर्ष आता सुरू झाला आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा आहे. जात, धर्म, पंथ आणि पक्षभेद विसरून देशभक्त म्हणून एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी आंदोलनाचे प्रतीक बनलेल्या ‘झुरळ’ आंदोलनाचाही उल्लेख केला. एका झुरळाने एका हुकूमशाहला नमवलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव; महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही थेट लक्ष्य केले. मोदीजी, आता तरी देशाकडे लक्ष द्या. तुमचे मंत्री आपली कामं सोडून राजकीय खेळ करण्यात व्यस्त आहेत. देशातील महागाई, घसरतं रुपयाचं मूल्य, बेरोजगारी आणि शिक्षणव्यवस्थेतील प्रश्न यावर बोलण्याऐवजी सरकारमधील मंत्री वेगळ्याच गोष्टींमध्ये गुंतले आहेत, असा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढताना तुम्हाला जितक्या वेदना झाल्या असतील, त्यापेक्षा कितीतरी जास्त वेदना पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आणि आम्हाला झाल्या आहेत. त्या कुटुंबांचा आक्रोश समजून घेण्याची गरज आहे.
मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनकर्त्यांनी हा विजय विद्यार्थी शक्तीचा विजय असल्याचा दावा केला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षांनी हा जनआंदोलनाचा विजय असल्याचे सांगितले असून, आगामी काळात शिक्षणव्यवस्थेतील सुधारणांसाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धारही व्यक्त केला.
