खुर्च्या मतदान करू शकतात हे आम्हाला पहिल्यांदाच कळालं, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी पक्षावर घणाघाती टीका केली.

Untitled Design (273

Untitled Design (273

Uddhav Thackeray held a press conference : महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी पक्षावर घणाघाती टीका केली. या निवडणुकांमधून आपला आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचल्याचा दावा करत, सत्ताधाऱ्यांनी घाणेरड्या आणि विचित्र पद्धतीने निवडणूक लढवल्याचा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई, ठाणे आणि संभाजीनगर येथे त्यांनी स्वतः प्रचार केला. मात्र ज्या ठिकाणी प्रचारासाठी जाऊ शकले नाही, त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांची आणि शिवसैनिकांची त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. सत्ताधारी पक्षाने ही निवडणूक साम, दाम, दंड, भेद या नीतीने आणि जणू जीवन-मरणाची लढाई असल्याप्रमाणे लढवल्याचा आरोप करत, उद्धव ठाकरे यांनी सांगितले की आमच्या अनेक पदाधिकारी आणि उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तडीपार नोटिसा काढण्यात आल्या आणि मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात आला.

खैरे अन् दानवेंच्या वादाचा फटका; छत्रपती संभाजीनगरची महापालिका ठाकरेंच्या हातून निसटली

सत्ताधाऱ्यांच्या गुंडगिरी आणि दडपशाहीला न घाबरता निवडणुकीला सामोरे गेलेले उमेदवार हे खरे लोकशाहीचे रक्षक असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. आपला महापौर व्हावा अशी आपली इच्छा होती, मात्र आवश्यक आकडा गाठता आला नसल्याची कबुली देतानाच, या निकालांमुळे सत्ताधारी पक्षाला घाम फुटला असल्याचा टोला त्यांनी लगावला. शिवाजी पार्कवरील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की त्या सभेला प्रचंड गर्दी होती, तर दुसऱ्या दिवशी सत्ताधाऱ्यांच्या सभेत खुर्च्यांची गर्दी दिसली. “खुर्च्या मतदान करू शकतात हे आम्हाला पहिल्यांदाच कळालं,” असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

सत्ताधारी पक्ष गेल्या चार वर्षांपासून पैसे वाटत फिरत असल्याचा आरोप करत, विजसाच्या नावाखाली आमदार, पदाधिकारी आणि नेत्यांनी अमाप पैसा वाटल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. राज ठाकरे आणि मी एकत्र आलो आहोत ते कायम एकत्र राहण्यासाठीच, असं स्पष्ट करत उद्धव ठाकरे म्हणाले की आमचे 54 नगरसेवक फोडले गेले, तरीही आम्ही 65 जागा जिंकल्या. भाजप स्वतः वाढलेली नाही, तर बाहेरची लोक मांडीवर घेऊन त्यांनी आकडे वाढवले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Exit mobile version