शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजपासून चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. (Uddhav Thackeray) सप्टेंबरमधील अतीवृष्टीनंतर त्यांनी काही गावांना भेट दिली होती. नुकसानग्रस्त गावांमध्ये मदत पोहोचली आहे की नाही? तेथील परिस्थिती कशी आहे यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.
राजकीय प्रचाराला आलेलो नाही. नेते येतात आणि तुमच्या कोपराला गूळ लावून जातात. शेतकऱ्यांनी आयुष्यात पाहिला नाही एवढा पाऊस झाला. हेक्टरी 50 हजारांची मागणी शेतकऱ्यांची आहे. कर्जमाफीही झाली आहे. दयावान सरकारचा अभ्यास सुरू आहे. अभ्यास कसला करताय. परदेशी समिती येणार म्हणे. मुख्यमंत्र्यानी कोपराला गूळ लावत 30 जून 2026 ची तारीख सांगितली आहे, असा टोला लगावला.
पॅकेज ही थट्टा आहे. पीकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. अकोल्यात दोन रूपये पीकविमा मिळाला आहे. ही थट्टा चाललीय. बँकांचा फायदा होवू न देता कर्जमाफी कशी देणार आहात. जूनपर्यंतचे हफ्ते कसे भरायचे,” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय. “न्याय मिळेपर्यंत तुमच्यासोबत राहणार,” असा शब्दही उद्धव ठाकरेंनी दिला.
आम्ही कसलीही हुकूमशाही मान्य करणार नाही; राज्य निवडणूक आयोगावर उद्धव ठाकरे आक्रमक
जिल्हा परिषद निवडणुकीत पंतप्रधान येतील आणि कोपराला गूळ लावून जातील. जूनची मुदत आम्हाला मान्य नाही, तात्काळ कर्जमाफी हवी. निवडणूक काढून घेण्यासाठी जूनची मुदत दिलीये,” असं माजी मुख्यमंत्री म्हणाले. अजित पवार मग तुम्ही काय हलवताय? सरकार हलवताय ना?” असा खोचक सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.
सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना उद्धव ठाकरे पुन्हा भेटी देणार आहेत. सकाळी 10 वाजता- छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील नांदरला उद्धव ठाकरे भेट दिली. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता – पाली (जिल्हा बीड), दुपारी दोन वाजता -पाथ्रूड, (तालुका भूम, जिल्हा धाराशिव), दुपारी साडेतीन वाजता – शिरगाव (तालुका परंडा, जिल्हा धाराशिव), सायंकाळी पाच वाजता – घारी (तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर) सायंकाळी सात वाजता- धाराशिव, बीड, लातूरच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन उद्धव ठाकरे दौऱ्याचा पहिला दिवस संपवतील. ते धाराशिव विश्रामगृहात मुक्कामी आहेत.
