Uddhav Thackeray : प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे म्हणाले की, चंद्रचूड यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय अद्याप दिलेला नाही. (Uddhav Thackeray) चंद्रचूड साहेब न्याय देण्याऐवजी टिप्पणीकार झाले होते. जर ते न्यायाधीशांच्या जागी कायद्याचे शिक्षक असते, तर त्यांना कदाचित अधिक प्रसिद्धी मिळाली असती, असे त्यांनी नमूद केले.
भाजपवर टीका
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेतृत्वाचे कौतुक करताना म्हटले की, राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी नेहमी आदर दाखवला आहे. भाजपवर टीका करताना ते म्हणाले, आजची भाजप फक्त ‘वापरा आणि फेका’ या धोरणावर काम करते. हे नेतृत्व कोणालाही टिकवून ठेवत नाही.
..म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाहीच; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात ठाकरे यांनी मत व्यक्त केले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राचे भवितव्य धोक्यात येईल. महाराष्ट्र वाचवण्याच्या दिशेने महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. तसंच, मुंबईतील धरावी प्रकल्प आणि आदानी समूहाविषयी उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही मुंबईला कोणालाही सोपवू शकत नाही. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अदानी यांची भेट झाली होती, पण ती धरावीच्या टेंडरशी संबंधित नव्हती. मुंबईवर नियंत्रण मिळवण्यासाठीच आमच्या सरकारला पाडण्यात आलं असंही ते म्हणाले.
जोरदार हल्ला
बटेंगे तो कटेंगे या भाजपच्या घोषणेबद्दल ठाकरे म्हणाले की, भाजपचे खरे धोरण ‘वापरा आणि फेका’ आहे. त्यांनी भाजपवर जोरदार टीका करताना सांगितले की, “पाकिस्तानचा मुद्दा महाराष्ट्र निवडणुकीत अप्रासंगिक आहे. भाजपकडे खऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी मुद्देच नाहीत.”
महाराष्ट्राचं रक्षण
मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाबाबत विचारलेल्या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बाळगलेले नाही, पण महाराष्ट्राचे शोषण करणाऱ्यांचा पराभव करणं हे माझे ध्येय आहे. त्यांनी पुढे विचारले की, अमित शाह यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे, परंतु, शिंदे व अजित पवार याला तयार आहेत का? असंही ते म्हणाले आहेत.
सरकार स्थापनेवर विश्वास
ठाकरे यांनी विश्वास व्यक्त केला की महाविकास आघाडी महाराष्ट्रात सरकार स्थापन करेल. भाजपच्या आतल्या संघर्षांमुळे त्यांचे नेतृत्व टिकून राहणे कठीण आहे. आम्ही महाराष्ट्रासाठी संघर्ष करत आहोत आणि हा संघर्ष शेवटपर्यंत चालू राहील असंही ते यावेळी म्हणाले