मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काल दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमात हिंदुत्व सोडून काल भाकरी भाजायला गेले होते का? हेच जर मी त्यांच्या कार्यक्रमात गेलो असतो तर लगेच हिंदुत्व सोडले म्हणून बोंब मारली असती. मग काल मोदींनी केले त्याला काय म्हणाल तुम्ही. त्यामुळे भाजप (BJP) म्हणजे हिंदुत्व नाही, हे समजून घ्या. आज हा उत्तर भारतीय मेळावा आपण येथे घेत आहोत. पण भारतीयांना आता भाजपकडून नेमकं हिंदुत्व म्हणजे काय याचे उत्तर मिळायला पाहिजे. एकमेकांचा द्वेष करणे म्हणजे हिंदुत्व नाही. हाताला काम देणं हे आमचं हिंदुत्व आहे. राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे, असे ठणकावत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांनी हल्लाबोल केला.
शिवसेनेने आयोजित केलेल्या उत्तर भारतीय मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, माझे वडील स्व. बाळासाहेब ठाकरे यांनीच भाजपला राम मंदिराचा प्रश्न सोडवायला सांगितला होता. त्यामुळे ते काय आमच्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करतात. कालच्या बोहरा समाजाच्या कार्यक्रमामुळे आम्ही असे म्हणू का भाजपने हिंदुत्व सोडले आहे. आम्ही ताकाला जाऊन कधीही भांडं लपवलं नाही. आमचं हिंदुत्व खोटं, तकलादू नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही २५-३० वर्षे भाजपबरोबर मैत्री निभावली. पण आम्हाला काय मिळाले. पण ते जेव्हा वरती केंद्रात सत्तेवर जाऊन बसले तेव्हा काय केले त्यांनी तर धोका दिला. भाजपने आधी अकाली दल, शिवसेनेची गरज नाही. त्यामुळे त्यांना सोडून द्या, ही भूमिका घेतली. त्यामुळे भाजपचे हिंदुत्व हे संधीसाधू हिंदुत्व आहे. यशाच्या शिखरावर गेल्यावर ज्यांनी मदत केली त्यांनाच सोडून दिले. त्यामुळे त्यांच्यापासून संपूर्ण देशाला धोका आहे. म्हणूनच आम्ही २०१९ ला वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
आम्हाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही कोणाबद्दल वैयक्तिक द्वेष करायला शिकवले नाही. तर देशाचे जे दुश्मन असतील मग ते हिंदू असू की मुस्लिम. त्याविरोधात कठोर भूमिका घेऊन आम्ही काम करत आलो आहोत. यापुढेही करत राहू असे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.