अहिल्यानगरमध्ये प्रेमाच्या बनावातून लुटीचा कट; हनिट्रॅप टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश
प्रेमाच्या बहाण्याने तरुणांना जाळ्यात ओढून लूट करणाऱ्या हनिट्रॅप टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठा पर्दाफाश केला आहे.
Honeytrap gang busted by LCB : प्रेमाच्या बहाण्याने तरुणांना जाळ्यात ओढून लूट करणाऱ्या हनिट्रॅप टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन तरुणींसह पाच आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या एका सराफालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून तब्बल 2 लाख 88 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फिर्यादीला फोनवरून गोड बोलणाऱ्या तरुणीने प्रेमाचा बहाणा करत भेटीचे आमिष दाखवले. तिच्या बोलण्याला भुलून फिर्यादी बारदरी (गर्भगिरी फाटा) परिसरात भेटीसाठी पोहोचला. मात्र, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्या गळ्याला कोयता लावून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटली.
बदनामीच्या भीतीने फिर्यादीने सुरुवातीला रस्ता लुटीची तक्रार दिली होती. मात्र या तक्रारीचा सखोल तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या लक्षात हा संपूर्ण प्रकार हनिट्रॅपचा असल्याचे उघड झाले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपोवन रोड परिसरात सापळा रचून मुख्य आरोपी शुभम बडे याला अटक केली.
सेटलमेंट नंतरचा पार्ट पहिले…; दादांच्या खास राहिलेल्या आमदारानं पवारांना दिला युतीचा ‘रोड मॅप’
चौकशीत शुभम बडे याने दोन तरुणी व अन्य साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर इतर आरोपींनाही अटक करण्यात आली. शुभम शहादेव बडे (वाणीनगर, सावेडी), सोहेल पापाभाई सय्यद (देवटाकळी, शेवगाव), अशपाक नासिर पठाण (यशवंतनगर, भिंगार), वैष्णवी राजेंद्र उनवने (भगवान बाबा चौक, अहिल्यानगर), रुपाली गजानन बनकर (एमआयडीसी, अहिल्यानगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून चोरीचे दागिने खरेदी करणारा सराफ सुरज प्रदीप शहाणे (शास्त्रीनगर, केडगाव) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपींनी लुटलेले दागिने सराफाला विकल्याचे चौकशीत उघड झाले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या सराफाने पोलिसी खाक्या दाखवताच संपूर्ण मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला. हनिट्रॅपद्वारे लूट केल्यानंतर आरोपी थेट गोवा ट्रिपला गेले होते. समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करून नगरमध्ये परतताच एलसीबीच्या पथकाने झडप घालून सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
मुख्य आरोपी शुभम बडे याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर अशपाक पठाण याच्यावर भिंगार पोलिस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपींनी यापूर्वीही पाच ते सहा जणांना अशाच पद्धतीने गंडवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. इज्जतीच्या भीतीने अनेक पीडितांनी तक्रार दिली नसावी, असा अंदाज आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांनी सांगितले की, हनिट्रॅपसारखा गंभीर गुन्हा उघडकीस आला असून आणखी काही पीडित पुढे येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे फसवणूक झालेल्यांनी कोणतीही भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
