पालकमंत्री शहरातील गुन्हेगारी संपवण्याची भूमिका घेतात, त्यांच्या पक्षाची उमेदवारी यादी पाहिली, तर…केंद्रीय मंत्री मोहोळ यांचा सवाल

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप करत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केली भूमिका.

Untitled Design (191)

Untitled Design (191)

Muralidhar Mohol’s indirect criticism of Ajit Pawar : महापालिका निवडणुकीत काही पक्षांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप करत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ(Minister Murlidhar Mohol) यांनी स्पष्ट भूमिका मांडली. गुन्हेगारांना किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकारणात स्थान देण्याबाबत भाजप कधीही सकारात्मक नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. बाजीराव रस्ता येथील भारत भवन येथे पुणे(Pune) शहर भाजप माध्यम कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बाजीराव रस्ता येथील भारत भवन येथे पुणे शहर भाजप(BJP) माध्यम कक्षाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, ‘निवडणुकीत काही पक्षांकडून गुन्हेगारांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली जात आहे. आम्ही या भूमिकेशी सहमत नाही. गुन्हेगारांना राजकारणात स्थान नसावे, ही भाजपची स्पष्ट भूमिका आहे.’ वार्ड क्रमांक 38 मधील उमेदवारीचा संदर्भ देत ते म्हणाले, ‘रोहिदास चोरघे यांच्या पत्नी प्रतिभा चोरघे या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहेत. त्यांच्या बाबतीत कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती मला नाही. मात्र एकूणच गुन्हेगार आणि राजकारण यांची सरमिसळ होऊ नये, हे महत्त्वाचे आहे.’ यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर टीका करताना सांगितले की, ‘पालकमंत्री शहरातील गुन्हेगारी संपवण्याची भूमिका घेतात. मात्र त्यांच्या पक्षाची उमेदवारी यादी पाहिली, तर हे कोणत्या तत्त्वात बसते, हे त्यांनी पुणेकरांना सांगावे.’

महापालिका निवडणुकीत शिवसेनेची जोरदार सुरुवात; कल्याण डोंबिवलीत 3 उमेदवार बिनविरोध

मोहोळ यांनी स्पष्ट केले की, दुसऱ्या पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिली असली, तरी भाजपने तसा कोणताही निर्णय घेतलेला नाही. ‘पुणेकर सर्व काही पाहत आहेत. नेमकी कोणाला उमेदवारी देण्यात आली आहे, याचा निर्णय मतदार मतपेटीतून देतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे भाजप मीडिया सेंटर सुरू करण्यात आले असून, या माध्यमातून पुढील 15 दिवस पक्षाकडून अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची निवडणुकीत युती असून, काही जागांबाबत चर्चा सुरू आहे. युती टिकावी, हीच सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपने यंदा महिला उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले असून, 50 टक्के आरक्षण अपेक्षित असतानाही तब्बल 92 महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.

मोहोळ यांनी यावेळी विकासकामांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, पुण्यात मेट्रोचा विस्तार, सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी ई-बसची संख्या वाढवणे, 24 तास पाणीपुरवठा योजना, वैद्यकीय महाविद्यालय, पुणे-लोणावळा दरम्यान तिसरा व चौथा मार्ग, विमानतळाचे नवीन टर्मिनल, चांदणी चौक विस्तारीकरण यांसारखी अनेक महत्त्वाची पायाभूत विकासकामे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्याचा सर्वांगीण विकास होत असून, शहराला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.

Exit mobile version