उन्हाळ्याच्या झळा कोसळत असतानाच मराठवाड्यासह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात शेतीमालाचं नुकसान झालं आहे. (Rain) अचानक आलेल्या पावसानं तापमानात 6 डिग्री सेंटीग्रेडनं घट होऊन किमान तापमान 32.6 सेंटीग्रेडवर घसरलं आहे. तर हिंगोली आणि नांदेड येथे वीज कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला आहे. विभागात 41 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत, त्यात 18 मोठी, 15 लहान दुभती जनावरांसह अन्य 8 प्राण्यांचा समावेश आहे.
विभागातील आठ जिल्ह्यात 11 हजार हेक्टर पेक्षा अधिक पिकांचं नुकसान झालं असून 20 हजारांहून अधिक शेतकरी बाधित झाल्याची शक्यता प्रशासनानं वर्तवली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसानं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार संभाजीनगर जिल्ह्यात 8 हजार 455 हेक्टरवरील पिके बाधित झाली असून 15 हजार 302 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
नांदेड, सोलापूर, लातूरसह ; या जिल्ह्यांमध्ये आजपासून धो धो पाऊस अन् गारपिटीचा इशारा
ही आकडेवारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काढणीला आलेला गहू, हरभरा, मका, बाजरी, कांदा यासह आंबा, डाळिंब आणि मोसंबी फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. अचानक पावसासह झालेल्या गारपिटीमुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं उत्पन्न गेलं आहे. राज्यात 17 ते 22 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं पुढील दोन दिवस शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
या पावसाचा विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये 533 गावांमधील 20 हजार 896 शेतकऱ्यांना फटका बसला असून एकूण 11 हजार 572 हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसात पडलेल्या विजामुळं विभागात दोन जणांचा मृत्यू झाला असून 41 लहान-मोठी जनावरं दगावली आहेत. काही दिवसात जिल्ह्याचं तापमान अतिशय वाढलं होतं, जवळपास 39 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा अधिकचे तापमान मार्च महिन्यातच अनुभवायला मिळाले. त्यात पावसामुळं तापमानात घट झाली. शहरात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळं तापमानात बदल झाला आणि वातावरणात गारवा निर्माण झाला.
गेल्या आठवड्यात 38.8 डिग्री सेंटीग्रेडवर गेलेला कमाल तापमानाचा पारा शुक्रवारी (20 मार्च) थेट 32.6 सेंटीग्रेडपर्यंत खाली आला आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळं विभागात पावसाळी वातावरण निर्माण झालं. शुक्रवारी नोंदवण्यात आलेले 32.6 सेंटीग्रेड तापमान हे गेल्या आठवडाभरातील नीचांकी तापमान ठरले. अचानक झालेल्या बदलामुळं अनेकांची प्रकृतीच्या समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी यांनी दिला.
जिल्ह्यातील स्थिती
संभाजीनगर – 15,302 शेतकरी, 8,455.78 हेक्टर नुकसान
जालना – 2,566 शेतकरी, 1,364.20 हेक्टर नुकसान
नांदेड – 56 शेतकरी, 34.25 हेक्टर नुकसान
बीड – 262 शेतकरी, 156 हेक्टर नुकसान
लातूर – 94 शेतकरी, 52 हेक्टर नुकसान
धाराशिव – 2,616 शेतकरी, 1,509 हेक्टर नुकसान
विभागात एकूण :
20,896 शेतकरी बाधित
11.572 हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त
