सुनेत्रा वहिनींबद्दल काँग्रेसने केलेलं वक्तव्य अयोग्यच’; सुप्रिया सुळेंनी अखेर भुमिका मांडलीच
सुनेत्रा पवारांवरील ‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; काँग्रेसची टीका अयोग्य असल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचे आवाहन.
Supriya sule on Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांच्याबाबत महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडिया खात्यावरून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह टीकेवरून काही दिवसांपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. काँग्रेसच्या पोस्टमध्ये सुनेत्रा पवार यांचा ‘गुंगी गुडिया’ (Gungi Gudiya) असा उल्लेख करण्यात आल्याने सत्ताधारी पक्षांकडून काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका करण्यात आली होती. आता या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नोकरीची आशा घेऊन आले अन् परीक्षा केंद्रावरच बसला धक्का, विद्यार्थ्यांसोबत नक्की काय घडलं?
सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसकडून करण्यात आलेली टिप्पणी चुकीची असल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्टपणे सांगितलं. तसेच या प्रकरणी आपण काँग्रेसच्या नेत्यांशी स्वतः चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं. “सुनेत्रा वहिनींबद्दल काँग्रेसने केलेलं वक्तव्य अयोग्यच होतं. मी स्वतः काँग्रेसच्या नेत्यांशी बोलले आहे”. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्र काँग्रेसच्या स्थानिक सोशल मीडिया टीमकडून संबंधित वक्तव्य करण्यात आलं होतं, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिकृत मत नसल्याचं सांगत त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवरील काँग्रेस आणि राष्ट्रीय नेतृत्वाच्या भूमिकेत फरक असल्याचं अधोरेखित केलं.
‘टीका करायला मराठी भाषेत खूप ताकद’
एखाद्या व्यक्तीवर राजकीय टीका करताना भाषेचा स्तर आणि शब्दांची निवड महत्त्वाची असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. “केंद्रातील काँग्रेस पक्षाने स्पष्ट भूमिका केली आहे की, कोणत्याही महिलेबद्दल किंवा कोणाही व्यक्तीबद्दल अशी टीका का करावी. टीका करायला मराठी भाषेत खूप ताकद आहे,” असं त्या म्हणाल्या.
त्यांनी पुढे कोणत्याही व्यक्तीचा अपमान होईल, अशा पद्धतीने राजकीय टीका करणं योग्य नसल्याचं सांगितलं. “टीका करायची असेल तर अनेक शब्दांनी टीका केली जाते. पण कोणाचाही अपमान होईल, अशी टीका करू नये. कोणत्याही व्यक्तीबद्दल टोकाची भूमिका घेणं हे मराठी संस्कृतीला न शोभणारं आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘जे झालं ते सोडून देऊया’
या वादावर आता पडदा टाकण्याचं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसला केलं. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने या प्रकरणात सकारात्मक भूमिका घेतल्याचं सांगत त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसनेही हा विषय पुढे न वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली. “माझी काँग्रेसला विनंती आहे की जे झालं ते सोडून देऊया. केंद्रातील काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवून निर्णय घेतला आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
मराठी कला-संस्कृतीचा अमेरिकेत जागर! ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना नाफा जीवन गौरव प्रदान!
सुनेत्रा पवार यांच्यावरील टिप्पणीवरून काँग्रेसविरोधात वातावरण निर्माण झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वतः काँग्रेसच्या नेत्यांशी संवाद साधल्याचं सांगितल्याने या प्रकरणाला आता वेगळं राजकीय वळण मिळालं आहे.