UPSC 2025 निकाल जाहीर; 958 उमेदवार यशस्वी, महाराष्ट्राचे 60 हून अधिक उमेदवार चमकले

परीक्षेत देशभरातून एकूण 958 उमेदवार यशस्वी झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 60 हून अधिक उमेदवारांनी यश संपादन केले आहे.

Untitled Design 145

Untitled Design 145

UPSC 2025 results declared : UPSC तर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा 2025 चा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत देशभरातून एकूण 958 उमेदवार यशस्वी झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 60 हून अधिक उमेदवारांनी यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांनी स्थान मिळवले आहे. यामध्ये ऋषीकेश आलासे यांनी 61 वा, आकाश त्रिवेदी यांनी 73 वा, गौरव चोपडा यांनी 83 वा, सायली पगार यांनी 87 वा आणि दीक्षा पाटकर यांनी 88 वा क्रमांक मिळवत राज्याचा मान उंचावला आहे.

याशिवाय ऋतुजा गायकवाड (106), वरुण टोकस (117), अंकिता अनिल पाटील (140), आर्यन सिरसीकर (175), कार्तिक बच्छाव (177), राहुल पाटील (224), शुभम शरद बेहेरे (226), ऋषिकेश पालिमकर (283), मोहिनी जगताप (323), अभिषेक ओझार्डे (336), हर्षवर्धन पाटील (349), हर्षवर्धन तिडके (355) यांसह अनेक उमेदवारांनीही परीक्षेत यश मिळवले आहे.

सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकरी कर्ज माफीची घोषणा…

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त पदांसाठी ऑगस्ट 2025 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान मुलाखती घेण्यात आल्या. या संपूर्ण प्रक्रियेनंतर यशस्वी ठरलेल्या 958 उमेदवारांची विविध केंद्रीय सेवांमध्ये नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या निकालात सामान्य प्रवर्गातील 317, आर्थिक मागास प्रवर्गातील (EWS) 104, इतर मागासवर्गीय (OBC) 306, अनुसूचित जाती (SC) 158 आणि अनुसूचित जमाती (ST) 73 उमेदवार यशस्वी झाले आहेत. याशिवाय आयोगाने 258 उमेदवारांची राखीव यादी देखील तयार केली आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना विविध प्रतिष्ठित सेवांमध्ये नियुक्ती मिळणार आहे. यात इंडियन ऍडमिनीट्रेटिव्ह सर्व्हिस (IAS) साठी 180, इंडियन फॉरेन सर्व्हिस (IFS) साठी 55, तर इंडियन पोलीस सर्व्हिस (IPS) साठी 150 जागा रिक्त आहेत. याशिवाय केंद्रीय सेवा गट-अ मध्ये 507 आणि गट-ब मध्ये 195 जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार या रिक्त पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. तसेच एकूण 348 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरूपाची असणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.

दरम्यान, नागरी सेवा परीक्षेचा अधिकृत निकाल व यशस्वी उमेदवारांची संपूर्ण यादी यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

Exit mobile version