Usha Chavan’s fight is successful : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी आपल्या हक्काच्या जमिनीसाठी सुरू केलेल्या लढ्याला अखेर मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून न्यायासाठी धावपळ करणाऱ्या उषाताईंनी सरकारकडे वारंवार निवेदनं दिली, मात्र त्यावर ठोस निर्णय होत नसल्याने त्यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर आपला जीवनगौरव पुरस्कार ठेवत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या प्रकरणात हस्तक्षेप करत उषा चव्हाण यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.
पुण्यातील धनकवडी परिसरातील वादग्रस्त टीडीआर व्यवहाराला तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणात अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई यांनी महत्त्वाची मध्यस्थी केल्याचं समोर आलं आहे. उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीचा वाद तब्बल 26 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होता. अखेर न्यायालयाने त्यांच्या मुलगा हृदयनाथ यांचा या जमिनीवरील हक्क मान्य केला. मात्र न्यायालयीन निर्णय त्यांच्या बाजूने लागल्यानंतरही प्रशासकीय पातळीवर वेगळ्याच हालचाली सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. ‘गोयल गंगा’ या खासगी विकासकाने पुणे महानगरपालिकेच्या मदतीने या जमिनीचा टीडीआर आपल्या नावावर करून घेतल्याचा गंभीर आरोप उषा चव्हाण यांनी केला होता.
न्याय मिळत नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मदतीची भावनिक साद घालत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांच्या पतीनेही माध्यमांसमोर येत आपली व्यथा मांडली होती. दरम्यान, आज सकाळी उषा चव्हाण आपल्या मुलासह ठाण्यातील टेंभी नाका येथील ‘आनंद आश्रम’ येथे दाखल झाल्या. तिथे उपस्थित शिवसैनिकांनी तात्काळ मंगेश देसाई यांच्याशी संपर्क साधला. मंगेश देसाई यांनी उषाताईंची संपूर्ण कायदेशीर बाजू समजून घेतल्यानंतर हा विषय थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिला.
मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सातारा गॅझेट वादावर मुख्यमंत्री फडणवीसांचं सविस्तर स्पष्टीकरण
या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत एकनाथ शिंदे यांनी तत्काळ नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. गोविंदराज यांच्याशी संपर्क साधला. पुणे महानगरपालिकेने विकासकाच्या फायद्यासाठी केल्याचा आरोप असलेला टीडीआर व्यवहार तातडीने स्थगित करण्याचे आदेश त्यांनी दिले. याशिवाय, या प्रकरणात पुणे महानगरपालिका, संबंधित विकासक आणि उषा चव्हाण या सर्व पक्षांची स्वतंत्र सुनावणी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असं स्पष्टपणे शिंदे यांनी सांगितलं.
यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंगेश देसाई यांच्या फोनवरून थेट उषा चव्हाण यांच्याशी संवाद साधला. “तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही,” असा शब्द देत त्यांनी उषाताईंना धीर दिला. पुढील सुनावणीवेळी आवश्यक सर्व कागदपत्रं सादर करण्यासही त्यांना सांगण्यात आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या उषा चव्हाण यांच्या लढ्याला आता राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर गांभीर्याने घेतलं जात असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय निर्णय होतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
