MBBS शिक्षण महागलं! अभिमत विद्यापीठांच्या फीवाढीवर कोणाचं नियंत्रण? पालक- विद्यार्थी चिंतेत…
मेडिकल शिक्षणाचा वाढता खर्च आणि डीम्ड विद्यापीठांच्या शुल्कवाढीवर नियंत्रण कोण ठेवणार, हा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Maharashtra College Fees Hike Admission 2026: महाराष्ट्रात डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण राज्यातील काही डिम्ड युनिव्हर्सिटीमधील एमबीबीएसच्या फीमध्ये मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. काही कॉलेजमध्ये ही वाढ तब्बल 36% पर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे डॉक्टर होण्यासाठी आता केवळ नीटमध्ये चांगले मार्क्स मिळवणं पुरेसं आहे का, की त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याची आर्थिक ताकदही लागणार आहे, असा प्रश्न उपस्थित होतोय.
MBBSला प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना NEET-UG परीक्षा द्यावी लागते. सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये फी तुलनेने कमी असली तरी सरकारी जागांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे NEETमध्ये पात्र ठरूनही सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांसमोर खासगी किंवा Deemed Universityच्या मेडिकल कॉलेजचा पर्याय राहतो. मात्र या कॉलेजमधील वार्षिक फी अनेकदा लाखो रुपयांमध्ये असते. त्यामुळे प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर मोठं आर्थिक आव्हान उभं राहतं.
पुण्यातील सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमेनच्या फी वाढीची सध्या चर्चा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा या कॉलेजच्या फीमध्ये तब्बल 36% वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे मागील वर्षी सुमारे ₹9.50 लाख असलेली फी यंदा सुमारे ₹13.58 लाखांपर्यंत गेल्याचं सांगण्यात येतं आहे. सिम्बायोसिसच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये वेगवेगळ्या वर्षांसाठी फी स्ट्रक्चर आणि त्यातील घटक वेगवेगळे आहेत.
दुसरं मोठं उदाहरण – डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज
पाहिलं तर 2025-26 मध्ये tuition fee सुमारे 27 लाख रुपये प्रति वर्ष आहे. त्याशिवाय university fee, hostel आणि इतर शुल्क स्वतंत्र आहेत. म्हणजेच केवळ tuition feeच चार वर्षांसाठी एक कोटी रुपयांच्या आसपास पोहोचू शकते. त्यात राहण्याचा आणि इतर शैक्षणिक खर्च जोडला तर कुटुंबावरचा आर्थिक भार आणखी वाढतो.
कराडच्या कृष्णा इन्स्टिट्यूटमध्येही लाखोंची फी
कराडमधील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्येही एमबीबीएसची फी लाखोंमध्ये आहे. उपलब्ध माहितीनुसार 2025-26 साठी ट्युशन फी सुमारे ₹24.50 लाख प्रति वर्ष आहे. त्याशिवाय एलिजिबिलिटी फी, कॉशन डिपॉझिट, हॉस्टेल आणि इतर शुल्क वेगळे आहेत. याचा अर्थ असा की, एका विद्यार्थ्याने एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी केवळ कॉलेजची ट्युशन फी म्हणूनच मोठी रक्कम खर्च करावी लागते आणि दरवर्षी फी वाढण्याची तरतूद असेल, तर पुढील वर्षांमध्ये हा खर्च आणखी वाढू शकतो.
महाराष्ट्रात Bharati Vidyapeeth, D.Y. Patil, Datta Meghe, MGM, Krishna Institute, Pravara आणि Symbiosis यांसारख्या संस्थांशी संबंधित Deemed medical collegesमध्ये MBBSचे शिक्षण उपलब्ध आहे. मात्र या सर्व कॉलेजची फी सारखी नाही. काही कॉलेजमध्ये वार्षिक शुल्क 20 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, तर काही ठिकाणी tuitionसोबत development fee, university fee, hostel आणि इतर शुल्क आकारले जातात. यंदा राज्यातील डीम्ड विद्यापीठांपैकी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाने शुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही.
Deemed University ना विद्यापीठाचा स्वतंत्र दर्जा असल्यामुळे त्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या शुल्काची रचना राज्यातील सामान्य खासगी मेडिकल कॉलेजपेक्षा वेगळ्या पद्धतीने होते. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला सरकारी सीट मिळाली नाही आणि त्याने Deemed Universityचा पर्याय निवडला, तर त्याला मोठ्या शुल्काचा सामना करावा लागू शकतो.
डीम्ड विद्यापीठांतील शुल्कात अवाजवी प्रमाणात वाढ करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, या शैक्षणिक शुल्कावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे मेडिकल शिक्षणाचा वाढता खर्च आणि डीम्ड विद्यापीठांच्या शुल्कवाढीवर नियंत्रण कोण ठेवणार, हा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.