राज्यात हुडहुडी वाढणार! पुणे, नाशिक, जळगावसह अनेक शहरांचे तापमान घसरले, पुढील 3 दिवस महत्त्वाचे
उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा घसरला असून सकाळी आणि रात्रीच्या वेळी गारठा अधिक जाणवत आहे.
The intensity of the cold will increase across the state over the next 3 days : काश्मीरसह संपूर्ण हिमालयीन भागात बर्फवृष्टी सुरू झाल्याचा परिणाम आता महाराष्ट्राच्या हवामानावर देखील जाणवू लागला आहे. उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा घसरला असून सकाळी आणि रात्रीच्या वेळी गारठा अधिक जाणवत आहे. गुरुवारी गोंदिया येथे राज्यातील नीचांकी 12.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुणे, नाशिक, जळगाव आणि नागपूरसह अनेक शहरांमध्ये देखील थंडीचा जोर वाढला आहे. हवामानातील या बदलांमुळे आगामी दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सकाळी घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागणार आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिमालयीन प्रदेशात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्यामुळे काश्मीर आणि आसपासच्या उंच पर्वतीय भागांत बर्फवृष्टी सुरू झाली आहे. या बदलामुळे उत्तर भारतातील तापमानात मोठी घट होण्यास सुरूवात झाली असून, थंड वाऱ्यांचा प्रभाव हळूहळू महाराष्ट्रापर्यंत पोहोचत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या या शीतलहरींमुळे महाराष्ट्रातील किमान तापमान घसरत आहे. दिवसा सूर्यप्रकाश असला तरी सकाळी आणि रात्री थंडी अधिक जाणवत आहे. काही ठिकाणी पहाटेच्या वेळी गार वारे वाहत असल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे.
जेन्सेन हुआंग यांच्यावर तिसऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबतच्या अफेअरचा आरोप, चीनच्या गुप्तचर यंत्रणांशी कनेक्शनचा संशय
दरम्यान, बंगालच्या उपसागरात 13 नोव्हेंबरच्या सुमारास कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र वायव्य दिशेने सरकून 14 ते 15 नोव्हेंबरदरम्यान तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होऊ शकते. या हवामान प्रणालीमुळे दक्षिण भारतातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या बदलाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर देखील होऊ शकतो. एका बाजूला उत्तर भारतातून थंड आणि कोरडे वारे राज्यात येत आहेत, तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे दमट वाऱ्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यावर शीत आणि दमट वारांची टक्कर होऊन हवामानात बदल होऊ शकतो. परिणामी, किमान तापमानात आणखी घाट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुरुवारी राज्यातील बहुतांश शहरांमध्ये किमान तापमानात घट झाल्याचे चित्र दिसून आले. गोंदिया येथे 12.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यातील एनडीए परिसरात 12.6 अंश, तर शिवाजीनगरमध्ये 14.6 अंश तापमान नोंदवले गेले. जळगावमध्ये 13 अंश, नाशिकमध्ये 13.9 अंश आणि नागपूरमध्ये 14.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईत मात्र किमान तापमान 25 अंशांवर असल्याने तुलनेने उबदार वातावरण होते. कोल्हापूरमध्ये 18.2, सांगलीत 17.1, सोलापूरमध्ये 16.7 आणि साताऱ्यात 14.4 अंश तापमान नोंदवले गेले. विदर्भातील काही शहरांमध्येही थंडीचा प्रभाव जाणवत असून, यवतमाळमध्ये 14 अंश, वाशिममध्ये 15.4 आणि वर्ध्यात 16.2 अंश तापमान होते.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
गुरुवारचे राज्यातील किमान तापमान पाहता, गोंदियात 12.8, पुण्यातील एनडीए परिसरात 12.6, जळगावमध्ये 13, नाशिकमध्ये 13.9, यवतमाळमध्ये 14, साताऱ्यात 14.4, पुणे शिवाजीनगर आणि नागपूरमध्ये प्रत्येकी 14.6, वाशिममध्ये 15.4, नांदेडमध्ये 15.9, महाबळेश्वरमध्ये 16.1, वर्ध्यात 16.2, सोलापूरमध्ये 16.7, धाराशिवमध्ये 17, सांगलीत 17.1, छत्रपती संभाजीनगरमध्ये 17.2, परभणीत 17.5, अमरावती आणि ब्रह्मपुरीमध्ये प्रत्येकी 17.6, अकोल्यात 17.9, बुलडाणा आणि चंद्रपूरमध्ये प्रत्येकी 18, कोल्हापूरमध्ये 18.2, तर मुंबईत 25 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
एकूणच, हिमालयातील बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव वाढत आहे. बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण भारतात पावसाची शक्यता असतानाच महाराष्ट्रात तापमानात आणखी घट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील नागरिकांना वाढत्या थंडीचा सामना करावा लागू शकतो.