जेन्सेन हुआंग यांच्यावर तिसऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबतच्या अफेअरचा आरोप, चीनच्या गुप्तचर यंत्रणांशी कनेक्शनचा संशय
जेन्सेन हुआंग यांच्याभोवतीचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. आणखी एका महिला कर्मचाऱ्याशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप समोर आला आहे.
Jensen Huang accused of a third affair : जगातील आघाडीची चिपनिर्मिती कंपनी Nvidia चे माजी प्रमुख जेन्सेन हुआंग यांच्याभोवतीचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. आणखी एका महिला कर्मचाऱ्याशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप समोर आला आहे. राऊटर्सने दोन सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. यामुळे हुआंग यांच्या कथित विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणात आता तिसऱ्या महिलेची भर पडली आहे.
याआधीही जेन्सेन हुआंग यांच्या दोन महिलांसोबतच्या कथित संबंधांची चर्चा झाली होती. यामध्ये चीनमधील व्यावसायिक महिला अॅलिस हुआंग आणि Nvidia च्या हेल्थकेअर विभागाच्या उपाध्यक्ष किम्बर्ली पॉवेल यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. मात्र, नव्याने समोर आलेल्या महिलेची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 8 नोव्हेंबर रोजी जेन्सेन हुआंग यांनी विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिल्याचे वृत्त आहे. अॅलिस हुआंग यांच्यासोबतच्या संबंधांची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी निवेदन जारी केले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी Nvidia मधील आपल्या पदाचा राजीनामा दिला. तब्बल 33 वर्षे त्यांनी या कंपनीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हुआंग यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी कोलेट क्रेस यांच्याकडे अंतरिम सीईओ पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कायमस्वरूपी सीईओ निवडण्यासाठी कंपनीचे संचालक मंडळ अंतर्गत आणि बाह्य उमेदवारांचा विचार करत आहे. दरम्यान, कंपनीचे अनुभवी अभियंता इयान बक यांचे नावही संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. या संपूर्ण प्रकरणात अॅलिस हुआंग यांचे नाव विशेष चर्चेत आहे. त्या सिंगापूरस्थित मेगास्पीड या क्लाउड कम्प्युटिंग कंपनीच्या माजी अधिकारी आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना त्यांचे चीनच्या गुप्तचर यंत्रणांशी संबंध असल्याचा संशय असल्याचे वृत्त आहे. मात्र, चीनने हे आरोप फेटाळले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी खळबळ! पालकमंत्री संजय शिरसाटांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, तीन आरोपी अटकेत
मेगास्पीड कंपनीने चीनला निर्बंधित एआय चिप्स मिळवून देण्यात मदत केली का, याची अमेरिकन तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याचे वृत्त आहे. याशिवाय, अॅलिस हुआंग यांच्याशी संबंधित संस्थांनी सुपर मायक्रोची उत्पादने चीनमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला का, याचाही तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे. जेन्सेन हुआंग यांचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जवळचे संबंध राहिले आहेत. Nvidia च्या प्रगत एआय चिप्स चीनला विकण्यास परवानगी द्यावी की नाही, याबाबतच्या चर्चेत हुआंग यांचा प्रभाव महत्त्वाचा राहिला आहे.
ट्रम्प यांनी सार्वजनिकरीत्या हुआंग यांची पाठराखण केली असून त्यांनी अमेरिकेसाठी उत्कृष्ट काम केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, चीनला चिप्स विकण्याच्या धोरणावरून अमेरिकेच्या प्रशासनात मतभेद असल्याचे वृत्त आहे. वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचे पडसाद आता अमेरिकन संसदेतही उमटण्याची शक्यता आहे. हाऊस फॉरेन अफेअर्स कमिटीचे अध्यक्ष ब्रायन मॅस्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेन्सेन हुआंग यांनी थँक्सगिव्हिंगपूर्वी अमेरिकन काँग्रेससमोर साक्ष देण्यास सहमती दर्शवली आहे.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
या सुनावणीदरम्यान त्यांच्या वैयक्तिक संबंधांपासून चीनशी संबंधित व्यावसायिक व्यवहारांपर्यंत अनेक प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, Nvidia च्या संचालक मंडळाने हुआंग यांना परदेशी गुप्तचर यंत्रणेने लक्ष्य केले होते का, याची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. एकीकडे Nvidia च्या नेतृत्वात मोठा बदल होत असताना दुसरीकडे जेन्सेन हुआंग यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि चीनशी संबंधित व्यवहारांबाबत नवनवीन दावे समोर येत आहेत. त्यामुळे जगातील आघाडीच्या एआय कंपनीभोवती निर्माण झालेला हा वाद आता जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे.