राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक; ट्रॅफिक, रस्ते आणि पेपरफुटीचे मुद्दे चर्चेत

कार्यक्रमस्थळी सर्व व्यवस्था चोख ठेवण्यासाठी पक्षाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू असल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design (82)

Congress meeting ahead of Rahul Gandhi’s Pune visit : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा 22 ऑगस्ट रोजी पुणे दौरा होणार असून या दौऱ्याच्या तयारीला काँग्रेसने वेग दिला आहे. पुण्यात झालेल्या काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकीत राहुल गांधी यांच्य दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. या दौऱ्याला सुमारे 25 ते 30 हजार नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा असून कार्क्रमस्थळी सर्व व्यवस्था चोख ठेवण्यासाठी पक्षाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू असल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक, सुरक्षा, नागरिकांच्या सुविधांसह सर्व बाबींचे बारकाईने नियोजन केले जात आहे. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रम यशस्वी आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या तयारीत व्यस्त असून दौरा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

याच बैठकीत पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांच्या गंभीर प्रश्नावरही चर्चा करण्यात आली. पुणेकरांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आरटीओ, वाहतूक पोलीस, महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व्यापक नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत बैठकीत मांडण्यात आले.

रायगड-नाशिक पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला; गोगावले-महाजनांवर शिक्कामोर्तब

शहरातील वाहतूक प्रश्न आता गंभीर स्वरूप धारण करत असून तो तातडीने सोडवण्याची आवशक्यता असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी देखील करण्यात आली. पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक वाढवून वाहतूक व्यवस्था सक्षम करणे आणि रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे गतीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे देखील पक्षाने नमूद केले.

दरम्यान, वंदे मातरम या विषयावर देखील काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली. या मुद्द्यावर चुकीच्या पद्धतीने माहिती पसरवली जात असून काहीजण जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला. समाजात अनावश्यक वाद निर्माण करण्याऐवजी वास्तव समोर आणण्याची गरज असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी म्हटले.

धर्मवीरच्या भूमिकेने करिअरला नवा अर्थ दिला; ठाकरे अन् शिंदेंमध्ये कोण जवळच? काय म्हणाले अभिनेते प्रसाद ओक?

उच्च न्यायालयाच्या भरती प्रक्रियेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर देखील बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. नीट परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणांनंतर देशात विविध परीक्षांमध्ये गैरप्रकाराच्या घटना समोर येत आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अशा गंभीर विषयांकडे सरकारने अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. वारंवार पेपरफुटीच्या घटना घडतात, याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

एकूणच, राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था, वंदे मातरम वाद आणि पेपरफुटी यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा करण्यात आली. आगामी दौऱ्याच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे आवाज देण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे.

follow us