Vadettiwar’s attack on Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. विरोधकांकडून सातत्याने राजीनाम्याची मागणी होत असतानाच शुक्रवारी चाकणकर यांनी आपला राजीनामा सादर केला. त्यांनी राजीनाम्याचे पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया देत चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला असला, तरी राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला दिसत नाही. त्यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात वैयक्तिक कारणास्तव स्वेच्छेने पदाचा त्याग करत असल्याचा उल्लेख केला आहे.
राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा तर दिला पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही!
स्वेछेने वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे!
म्हणजे खरात प्रकरणात त्यांनी महिलांवर,पत्रकारांवर टाकलेला… pic.twitter.com/NFGlrLXfvJ— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 20, 2026
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणात महिलांवर तसेच पत्रकारांवर दबाव टाकल्याचे आरोप झाले होते. या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल होऊ नये म्हणून विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. मात्र या सर्व प्रकरणाबद्दल चूक झाल्याची कबुली किंवा खेद व्यक्त करण्याची भूमिका चाकणकर यांनी घेतलेली नाही. त्यामुळे राजीनामा देताना देखील उपकार केल्यासारखे वागणे केले असून ते अत्यंत निषेधार्ह असल्याची टीका त्यांनी केली.
Video : मंत्र्याचं बोट रक्तानं माखलं, भाजप–सेनेच फाटलं; साताऱ्यात राजेंनी काय केलं?
याशिवाय चाकणकर हा या संपूर्ण प्रकरणातील केवळ छोटा मासा आहे. या प्रकरणात अजून किती मंत्री सामील होते? या भोंदूबाबाला कोणी राजाश्रय दिला? त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोणी केला? या सर्व बाबींची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली. खरात प्रकरण दाबण्यासाठी कोणत्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी फोन केले, याचा देखील तपास झाला पाहिजे. या प्रकरणात दोषी आढळल्यास प्रत्येकावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या राजकारणात या प्रकरणावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधकांनी या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली असून, सरकारने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी देखील मागणी पुढे येत आहे. त्यामुळे अशोक खरात प्रकरण आणि त्यानंतर झालेला हा राजीनामा राज्याच्या राजकारणात आणखी चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
