Letsupp Exclusive : पाथर्डीतील जमीन, भोंदू अशोक खरातसोबत अतिरिक्त कलेक्टरचे डील सापडले

Ashok Kharat खरातच्या दरबारात केवळ राजकीय नेतेच नाही, तर मोठ्या पदांवरील सरकारी अधिकारीही मुंग्यांसारख्या रांगा लावत असत.

  • Written By: Published:
Letsupp Exclusive : पाथर्डीतील जमीन, भोंदू अशोक खरातसोबत अतिरिक्त कलेक्टरचे डील सापडले

Nashik Ashok Kharat Case & Land Deal : अंधश्रद्धेचा बाजार मांडून ५८ हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या ‘काळ्या’ साम्राज्यात आता प्रशासकीय व्यवस्थेचेही हात माखल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांत नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांचे थेट कनेक्शन असल्याचे ठोस पुरावे लेट्सअप मराठी’च्या हाती लागले आहेत.

प्रमोशनसाठी लोटांगण आणि जमिनीचा व्यवहार

अशोक खरातच्या दरबारात केवळ राजकीय नेतेच नाही, तर मोठ्या पदांवरील सरकारी अधिकारीही मुंग्यांसारख्या रांगा लावत असत. चांगलं पोस्टिंग मिळावं किंवा हव्या त्या ठिकाणी बदली व्हावी, या आमिषापोटी हे अधिकारी भोंदू बाबाच्या पायाशी लोटांगण घालत होते. मात्र, हे संबंध केवळ आध्यात्मिक न राहता थेट जमीन व्यवहारापर्यंत पोहोचले होते.

अतिरिक्त जिल्हाधिकारी भांडे-पाटील यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करत खरात कुटुंबासोबत व्यावसायिक भागीदारी केल्याचे कागदपत्रे सांगतात. नाशिक तालुक्यातील वाकडी आणि पाथर्डी शिवारात साधारण 1 एकर (40 आर) क्षेत्र खरेदी करण्यात आले असून, या जमिनीच्या सातबाऱ्यावर अशोक कुमार खरात आणि अभिजीत भांडे-पाटील यांच्या पत्नी प्रीती भांडे-पाटील यांची नावे सामायिक क्षेत्रात दिसत आहेत. 2022 मध्ये झालेला हा फेरफार या भ्रष्ट युतीचा मोठा पुरावा ठरत आहे.

‘त्या’ लग्नाला नेत्यांची हजेरी; पण शिंदेंची सावध माघार

जानेवारी 2020 मध्ये अशोक खरातच्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले होते. या सोहळ्याला रूपाली चाकणकर यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या लग्नाला उपस्थित राहणार होते. मात्र, ऐनवेळी या बाबाच्या संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांनी शिंदेंना माहिती देताच, त्यांनी नाशिकमधूनच आपला दौरा अर्धवट सोडून माघार घेतली होती.

महिला अधिकाऱ्यांचेही शोषण? SIT कडून चौकशीची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातच्या तावडीत काही महिला सरकारी अधिकारीही अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बदल्यांच्या हव्यासापोटी या महिलांचे शारीरिक आणि मानसिक शोषण झाल्याचा संशय असून, एसआयटीच्या तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पापकर्माचा ‘सातबारा’ आता पोलिसांच्या हाती

अशोक खरातच्या अटकेनंतर आता प्रशासकीय वर्तुळाचे धाबे दणाणले आहेत. कैक कोटींची माया जमवणाऱ्या या भोंदूला जमीन खरेदी-विक्रीत कोणी कोणी मदत केली? कोणते अधिकारी त्याच्या पेरोलवर होते? आणि शोषणाच्या प्रकरणात कोणाकोणाचे मूक समर्थन होते? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासातून बाहेर येणार आहेत.

 

follow us