खरात प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहारात CA पोफळेची भूमिका काय? तपासात होणार मोठे खुलासे
ट्रस्टचा संचालक आणि चार्टर्ड अकाऊंटंट ललित पोफळे सध्या पोलिसांच्या रडारवर आहे. त्याची देखील चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
What is the role of CA Pophale? : नाशिकमधील भोंदूबाबा खरात याच्या नव्या-नव्या कारनाम्यांचे धक्कादायक खुलासे समोर येत असताना आता त्याच्या आर्थिक गैरव्यवहारांवर देखील यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे. हवालाच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपये परदेशात पाठवल्याचे गंभीर आरोप होत असून काही आर्थिक व्यवहार अत्यंत संशयास्पद असल्याची माहिती समोर येत आहे.
खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या आर्थिक हालचालींची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे, 2018 साली अवघ्या 4 लाख रुपयांची उलाढाल असलेल्या या ट्रस्टची मालमत्ता आता कोट्यवधींच्या घरात पोहोचल्याचे उघड झाले आहे. या सर्व व्यवहारांची जबाबदारी सांभाळणारा ट्रस्टचा संचालक आणि चार्टर्ड अकाऊंटंट ललित पोफळे सध्या पोलिसांच्या रडारवर आहे. त्याची देखील चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान स्वतःचा बचाव करण्यासाठी ललित पोफळे हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अशोक खरातविरोधात तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
अधिकाऱ्यांचे वाईफ स्वॅपिंग अन्… वडेट्टीवारांचे दावे तर पुरावे द्या म्हणत बावनकुळे भडकले
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. उद्योजकांच्या आर्थिक क्षमतेनुसार त्यांना वेगवेगळ्या बाबांकडे नेण्याचा प्रकार सुरू होता. 1000 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या उद्योजकांना बंगळुरूतील लक्ष्मण महाराज, 500 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्यांना अशोक खरात तर 200 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या उद्योजकांना सुजित देशमुख यांच्याकडे नेले जात होते. याशिवाय अनेक ग्राहकांना रघुनाथ येमूळ या ज्योतिषाकडे देखील पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. अशोक खरात आणि त्याच्याशी संबंधित सर्व ट्रस्टची तपासणी केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. चौकशीदरम्यान दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत असताना, सीए ललित पोफळेने दाखल केलेल्या FIR मुळे या प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळण्याची शक्यता आहे. पुढील काळात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.