Vadettiwar’s statement on Rajya Sabha candidacy is under discussion :राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारीवरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र, अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसने उद्योगपती आणि पक्षाचे नेते राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. रविवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सोमवारी राजेंद्र जैन यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विधानभवनात उमेदवारी अर्ज दाखल केला. या घडामोडीनंतर छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप करत राज्यसभेच्या उमदेवारीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच रणनीती असल्याचा दावा केला आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांचे निर्णयही मुख्यमंत्रीच घेत आहेत. कोणाला कोणते पद द्यायचे, कोणाला कुठे पाठवायचे आणि कोणती जबाबदारी द्यायची हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच ठरवत असल्याचे त्यांनी म्हटले.
छगन भुजबळ यांच्या संदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत भुजबळ यांना मंत्रीपद सोडण्याची इच्छा नसणे स्वाभाविक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींवर बोलण्याचा अधिकार नसला तरी अजित पवारांच्या पक्षात नेमके काय सुरू आहे, याचा अंदाज आता संपूर्ण महाराष्ट्राला आला असल्याची टीकाही त्यांनी केली.
नमाज पठण नाही केले तर कुटुंब नरकात जाईल; चार्जशीटमधील आरोपांमुळे नाशिक TCS प्रकरण पुन्हा चर्चेत
याचवेळी त्यांनी राज्यातील सत्तासमीकरणांवर भाष्य करत एकनाथ शिंदे यांचाही उल्लेख केला. महायुती सरकार स्थापन होण्यात एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी लाडकी बहीणसह विविध योजना राबवल्या. मात्र आज परिस्थिती बदलली असून सरकारमधील मंत्र्यांबाबत घेतले जाणारे निर्णय आणि त्यांच्यावर होणारी टीका पाहता वेगळेच चित्र दिसत आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. बच्चू कडू यांनी मंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी, इतरांना सल्ला देण्यापूर्वी बच्चू कडूंनी स्वतःपासून सुरुवात करावी, असा टोला लगावला.
दरम्यान, राज्यासमोरील दुष्काळी संकटाबाबतही वडेट्टीवार यांनी चिंता व्यक्त केली. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने राज्यावर मोठे संकट ओढवू शकते, असा इशारा त्यांनी दिला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, कांदा उत्पादकांच्या समस्या आणि मुंबईतील सुरू झालेली पाणी कपात या गंभीर मुद्द्यांवर तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
22 जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील पाणीटंचाई, शेती संकट आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर व्यापक चर्चा होणे आवश्यक असल्याचेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. राज्यसभा उमेदवारीच्या निर्णयापासून ते राज्यातील दुष्काळी संकटापर्यंत विविध मुद्द्यांवर केलेल्या या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
