बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात वाल्मिक कराड (Karad) हा जेलमध्ये आहे. तसंच, परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचा देखील कराडवर आरोप आहे. आता कराड संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा गोपनीय जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये बांगर यांनी या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यासह त्याच्या मुलाचं देखील नाव घेतल्याची माहिती समोर आली आहे.
कराडच्या मुलाचही नाव
परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती, त्यांच्या हत्या प्रकरणाला आता दोन वर्ष उलटून गेले आहेत. या प्रकरणात महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला आहे. 164 नुसार विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा जबाब या प्रकरणात महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
परळीच्या महादेव मुंडे प्रकरणात घडामोडींना वेग; 14 संशयीतांच्या मानसशास्त्रीय तपासण्या
बांगर यांनी या प्रकरणात दिलेल्या जबाबामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचं देखील नाव घेतल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे हा जबाब देखील अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, यामुळे आता वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान आजच या प्रकरणातील दोन संशयितांची नार्को टेस्ट देखील होत आहे. यातून आता एसआयटीच्या हाती नेमकं काय लागतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंडे प्रकरणात चौकशी
दरम्यान, या मुंडे प्रकरणात आतापर्यंत 14 संशयीतांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यातील 8 जणांच्या लाय डिटेक्टर चाचण्या झाल्या, परंतु त्यातून काही सकारात्मक पुरावे समोर न आल्याने त्यांची ब्रेन मॅपिंग करण्यात आलेली नव्हती तर उर्वरित 6 जणांच्या तपासणीत काही बाबी समोर आल्याने त्यांच्या ब्रेन मॅपिंग तपासणी करण्यात आल्या होत्या, तसेच 3 जणांची नार्को टेस्ट देखील यापूर्वीच करण्यात आलेली आहे. दरम्यान मंगळवारी एका संशयीताची ब्रने मॅपिंग तपासणी करण्यात आलेली असून आता उर्वरित दोघांची नार्को टेस्ट आज होणार आहे.
