Walmik Karad : पवनचक्की मालकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप आणि संतोष देशमुख प्रकरणात रडारवर असलेल्या वाल्मीक कराड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीकडून सध्या वेगाने तपास सुरु आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी वाल्मीक कराड यांच्याशी संबंधित (Walmik Karad ) महिलांची विविध पोलीस ठाण्यात बसवून चौकशी केली. वाल्मीक कराड याच्यावरील दबाव वाढला असून तो कोणत्याही क्षणी पोलिसांसमोर शरणागती पत्कारेल, असं सांगितले जात आहे.
वाल्मिक कराडला का अटक होत नाही, तो सरकारचा जावई आहे का?, वडेट्टीवार संतापले
संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 21 दिवस उलटले आहेत. तेव्हापासून वाल्मीक कराड फरार आहेत. मात्र, सीआयडी पथकाने अलीकडेच वाल्मीक कराड यांचे बँक खाते गोठवले होते. याशिवाय, वाल्मीक कराड यांची संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालायकडून परवानगी मिळवण्याच्या हालचालीही सुरु झाल्या होत्या. तसेच वाल्मीक कराड यांच्याकडे पासपोर्ट नाही. त्यामुळे त्यांना देशाबाहेर पळून जाणेही शक्य नाही.
सीआयडीच्या पथकांनी कराड यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरु केल्याने त्यांच्यावरील मानसिक दबावही वाढला आहे. याशिवाय, बँक खाती गोठवून केलेल्या आर्थिक नाकेबंदीमुळे वाल्मीक कराड याच्यासमोर आता कोणताही पर्याय उरला नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच आता वाल्मीक कराड सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळपर्यंत पोलिसांना शरण येईल, असे सांगितले जात आहे.
वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांना कार्यकर्ता आहे. धनंजय मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकीची सर्व सूत्रे वाल्मीक कराड यानेच हाताळल्याचे सांगितले जाते. वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरुनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, असा आरोप होत आहे. बीडमधील सर्वपक्षीय नेत्यांनी वाल्मीक कराड याच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे हेदेखील अडचणीत आले आहेत. वाल्मीक कराड कनेक्शनमुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
चौकशीला बोलावणार?
बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीचे पथक वेगाने तपास करत आहे. सीआयडीचे एकूण नऊ पथकं या प्रकरणाचा तपास करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी सीआयडीच्या पथकाने केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मनी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या पत्नीची देखील चौकशी करण्यात आली आहे.