Ajit Pawar : मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडल्यानंतर वाशिमचं पालकत्व कुणाला मिळणार? अजित पवार याबाबत काय निर्णय घेणार? या चर्चेतील प्रश्नांची उत्तरं मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांना दिली आहे. मंत्रिमंडळात भरणे यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याचं पालकमंत्रिपद नव्हतं. आता मात्र त्यांना वाशिम जिल्ह्याची जबाबदारी मिळाली आहे. भरणे यांना पालकमंत्री करून अजितदादांनी नवी राजकीय खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
खरंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद पाहिजे होते. मात्र आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूरची जबाबदारी मिळाली. त्यामुळे मुश्रीफ यांचा हिरमोड झाला. यानंतर मुश्रीफ यांना थेट वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र येथे मुश्रीफ यांचं मन काही रमलं नाही. कोल्हापूरपासून वाशिम 600 किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरावर आहे. त्यामुळे प्रवासात खूप वेळ जातो असे कारण पुढे करत मुश्रीफांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडलं होतं.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत चाललंय काय; हसन मुश्रीफांनी वाशिमचं पालकमंत्रिपद सोडलं?
पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरु असतानाच कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी संधी न मिळाल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची नाराजी लपून राहिलेली नव्हती. (Washim) कोल्हापूरचे पालकमंत्री शिवसेनेकडे गेलं असून सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे आहे. त्यामुळे आबिटकरांच्या निवडीवर मुश्रीफांची नव्हे, तर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांचीही नाराजी लपून राहिलेली नाही.
हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरपासून थेट वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु, ते या पदाबाबत फारसे उत्सुक नव्हते. 26 जानेवारीनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासाठी हसन मुश्रीफ वाशिमला पोहोचले होते. मात्र, शासकीय ध्वजरोहणाचा कार्यक्रम पार पडताच कोणतीही बैठक न घेता त्यांनी थेट पुन्हा कोल्हापूर गाठले होते. त्यामुळे मुश्रीफ नाराज असल्याची चर्चा तेव्हाही राजकीय वर्तुळात रंगली होती.
यानंतर त्यांनी पालकमंत्रिपद सोडले. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर कुणाला संधी द्यायची असा प्रश्न होता. अजित पवार मंत्री दत्ता भरणे यांना वाशिमचे पालकमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना या पदाचा अनुभव आहे. महायुती सरकारमध्ये त्यांना कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री केलेले नव्हते. आता वाशिमचे पालकमंत्री म्हणून त्यांची आणखी एक इनिंग सुरू झाली आहे.
पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये धुसफूस कायम; हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना