Download App

समृध्दीवर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, कार कठड्याला धडक्याने एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी

  • Written By: Last Updated:

बुलडाणा : समृध्दी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. या महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबता थांबेना. आजही या महामार्गावर कारचा भीषण अपघात (Terrible Car Accident)झाला. समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समृद्धी महामार्गावरील पुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी पावणेबारा वाजताच्या दरम्यान घडला. (Car accident on Samriddhi HighwayOne dead and 4 injured)

मिळालेल्या माहितीनुसार, अर्पित बनसोडे, दिनेश बनसोडे, सविता बनसोडे, अश्वजित बनसोडे, सुरेश बनसोडे हे सर्वजण आज एमएच 27 डीए 1927 क्रमांकाच्या कारने अमरावतीहून नाशिककडे जात होते. यांची कार सिंदखेड राजाजवळ आली असतांना कार चाललाला डुलकी लागली आणि त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळं भरधाव वेगातील कार महामार्गावरील पुलाच्या कठड्याला जोरदार धडकली. यामध्ये नाशिकचे बनसोडे कुटुंबीय गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच क्यूआरव्हीचे कर्मचारी अजय पाटील, अनुदीप पवार, परमेश्वर शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरू केले. त्यांनी अपघातग्रस्तांना कारमधून बाहेर काढले.

नागपुरचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास नव्हे; गडकरी, फडणवीसांना आमदार लिंगाडेंचा टोला 

जखमी प्रवाशांना तात्काळ पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जालना येथे पाठविण्यात आले. यासीन शहा व डॉक्टर बोराडे, चालक दिगंबर शिंदे व प्रवीण राठोड यांनी जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून जालना शासकीय रुग्णालयात नेले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतांना अपघातातील गंभीर जखमी झालेले सुरेश बनसोडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातानंतर महामार्गवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलीस पीएसआय शैलेश पवार पोलीस हवालदार मुकेश जाधव, प्रवीण राणे व महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान भगवान गायकवाड, अजय पाटील, श्रीराम महाजन यांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून हटवले आणि वाहतूकही सुरळीत केली. दरम्यान, समृध्दी महामार्ग सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. त्यामुळं प्रवाशांकडून चिंता व्यक्त केली जाते.

Tags

follow us