नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बाग येथील स्मृति मंदिरात आज भाजपच्या आमदारांचा संघपदाधिकाऱ्यांकडून अभ्यासवर्ग घेतला जाणार आहे. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी महत्वाचे वक्तव्य केले आहे.
नागपुरातील स्मृती मंदिरमध्ये सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला पुष्पांजली करण्यासाठी अनेक मंत्री, आमदार दाखल झाले आहेत. आज सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे एक पुस्तक सर्वांना भेट देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, गेली २५ वर्ष शिवसेना आमच्या सोबत होती परंतु या ठिकाणी त्यांच्यामधील लोक येत नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील इथे येतील कारण ते ही जुने स्वंयसेवक आहेत.
दरम्यान सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळं सर्वं मंत्रिमंडळ व आमदार सध्या नागपुरात आहेत. यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बाग येथील स्मृती मंदिरात आज भाजपच्या आमदारांचा संघपदाधिकाऱ्याकडून अभ्यासवर्ग घेतला जाणार आहे.
सकाळी 7:30 वाजता या अभ्यास वर्गाला सुरुवात झाली असून संघाचे जेष्ठ पदाधिकारी आमदारांना संघ परिचय आणि संघ भाजप समन्वय यावर मार्गदर्शन करतील. यावेळी भाजप आमदारांनी या ठिकाणी हजेरी लावल्याचे दिसून आले आहे.