नागपूर : काँग्रेस नेते, आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायलयाने जिल्हा बँकेतील 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात केदार यांच्यासह सहा जणांना दोषी ठरविले आहे. 2002 मध्ये केदार बँकेचे अध्यक्ष असताना 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हे दाखल होऊन तपास सुरु झाला होता. आता या प्रकरणात बँकेने सुनील केदार, मुख्य रोखे दलाल केतन शेठ, बँकेचे तत्कालिन मॅनेज अशोक चौधरी यांच्यासह आणखी तीन जणांना दोषी ठरविले आहे. (Congress Leader Sunil Kedar Convicted in Nagpur District Bank’s Rs 150 Crore Scam Case)
1999 मध्ये सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. या दरम्यानच्या काळात बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंच्युरी डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस या खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून सरकारी रोखे (शेयर्स) खरेदी केले. पण या कंपन्यांकडून खरेदी केलेले शेअर्स प्राप्त झाले नाहीत किंवा ते बँकेच्या नावेही झाले नाहीत. कंपन्यांनी बँकेची रक्कमही परत केली नाही. कालांतराने या कंपन्या देखील दिवाळखोरीत निघाल्या.
याशिवाय सहकार विभागाच्या कायदानुसार परवानगी न घेता बँकेची रक्कम दुसरीकडे गुंतवता येत नाही. पण या नियमाचे देखील उल्लंघन करत रक्कम गुंतवली गेली होती, असा ठपका केदार यांच्यावर ठेवण्यात आला होता. या सर्व आरोपांनंतर फौजदारी गुन्ह्याची नोंद झाली होती. पुढेया प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर 22 नोव्हेंबर 2002 रोजी सीआयडीने नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. तेव्हापासून या खटल्याची सुनावणी सुरु होती. मात्र विविध कारणांनी खटला प्रलंबित होता. काही दिवसांपूर्वी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता.