Download App

Devendra Fadnavis : जे निधी देत नव्हते त्यांना घरी बसवलं, जे निधी देतात त्यांना….

वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काशी विश्वनाथ मंदिराचा (Kashi Vishwanath Temple) कायापालट केला तशाच प्रकारे आमचं सरकार देखील बंजारा काशीचा कायापालट करील. मागच्या काळात आपण मोठं काम सुरु केलं होतं पण गेल्या अडीच वर्षात फुटकी कवडी देखील मिळाली नाही. जे आपण दिले होते त्यानंतर एक पैसा मिळाला नाही. सेवालाल महाराजाच्या महिमेने जे पैसे देत नव्हते त्यांना घरी बसवलं. जे पैसे देतात त्यांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात पुन्हा या ठिकाणी आणलं, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम येथील बंजारा समाजाच्या कार्यक्रमातून महाविकास आघाडीवर केला.

एकनाथ शिंदेंनी माझ्याकडे तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत. बंजारा समाजासाठी 537 कोटी रुपायांचा विकास आराकाडा तयार केला आहे. मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात तांड्यापर्यत विकास पोहचून दाखवू. कोणालाही शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये यासाठी उचित योजना तयार करणार आहेत. बंजारा समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मोठं काम केल जाणार आहे. नॉनक्रिमेलियर लावू नका अशी केलेली मागणी योग्य आहे. नॉनक्रिमेलियरची अट कायद्यात बसत असेल तर योग्य निर्णय घेऊ, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

वर्धा-नांदेड रेल्वेचा मार्ग पोहरागडवरुन गेला पाहिजे अशी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. पंतप्रधानांनी ती मागणी मान्य केली होती. आता पोहरागडमध्ये देखील हा मार्ग येतो आहे. आत्ताच जाहीर झालेल्या बजेटमध्ये या रेल्वेसाठी पाचशे कोटी रुपये दिले आहेत. लवकरच पोहरागडमध्ये ही रेल्वेलाईन येईल. राज्य सरकारने देखील 250 कोटींचा रस्ता मंजूर केला आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पंतप्रधान मोदींनी बंजारा समाज आणि भटक्या-विमुक्तासाठी आता नवीन महामंडळ सुरु केलं आहे. राज्य सरकारकडून या महामंडळासाठी निधी दिली जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. ते पुढं म्हणाले, गोंडबोली भाषेच संवर्धन झालं पाहिजे. यासाठी आपल्या अॅकडमी सुरु करायची होती. पण सरकार गेल्यामुळे झालं नाही. आता आपलं सरकार आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबरोबर ही अॅकडणी सुरु केली जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह १५ मंत्री पोहरादेवीत पोहचले होते. संत सेवालाल महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. तसेचं शिंदे-फडणवीस यांच्या हस्ते सेवा ध्वजाचं अनावरण करण्यात आले.

Tags

follow us