नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज (२० मे) काँग्रेसचे निलंबित नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख (Aashish Deshmukh) यांची भेट घेतली. देशमुख यांच्या घरी फडणवीस, बावनकुळे यांच्यासाठी नाष्ट्याचा बेत करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि उमरेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, या भेटीमुळे देशमुख हे पुन्हा भाजपमध्ये परतणार का? या चर्चांना सुरुवात झाली आहे. (Devendra Fadnavis and Chandrashekhar Bawankule present Congress leader Aashish Deshmukh home)
या भेटीवर बोलताना देशमुख म्हणाले, मी काँग्रेसमध्येच आहे, मला दिलेल्या नोटिशीच सविस्तर उत्तर मी दिलं आहे. मला १०० टक्के खात्री आहे की काँग्रेस मला काढणार नाही. पण फडणवीस यांच्याशी माझे पक्षापलिकडील कौटुंबिक संबंध आहेत, त्यामुळे ते आज नाष्ट्यासाठी आले होते. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ घेऊ नये. त्यांनी नाष्ट्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने आस्वाद घेतला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, देशमुख यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरुन कौतुक केले. ते म्हणाले, विदर्भाचा हित साधणारा महाराष्ट्रात कोणी नेता असेल तर ते आज देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या माध्यमातून विदर्भामध्ये विकासाचे चांगले कार्यक्रम आणि योजना राबविण्यात येत आहेत. माझा पक्ष वेगळा असला तरी ते चांगले काम करत आहेत हे मी आवर्जून सांगतो.
आशिष देशमुख हे मुळचे काँग्रेसी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष, मंत्री रणजित देशमुख यांचे ते पुत्र. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ते पुतणे. जिल्ह्यातील राजकारणात न पटल्याने देशमुख यांनी त्यांनी भाजपची वाट धरली. भाजपने २००९ मध्ये सावनेरमधून देशमुख यांना केदार यांच्याविरोधात मैदानात उतरवलं. पण अवघ्या साडे तीन हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपने त्यांना काटोलमधून तिकिट दिले. यात त्यांनी काका अनिल देशमुख यांना पराभूत करुन पहिल्यांदा विधानसभा गाठली.
मात्र काही वर्षांतच देशमुख यांचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विदर्भ विकासाच्या मुद्द्यावर मतभेद झाले. त्यातून त्यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ते भाजपामध्ये एकाकी पडत गेले. अखेर ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांनी आमदारकीचा अन् भाजपचा राजीनामा दिला. त्यानंतर वर्धा येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र आता पुन्हा एकदा ते भाजपवासी होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.