अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी न करता, पंचनामे न केल्याने ठाकरे गटाचे प्रकाश मारोडकर आक्रमक झाले. शेतकऱ्यांसह प्रकाश मारोडकर यांनी तहसीलदारांच्या दालनात सडलेले कांदे फेकून सरकारचा निषेध केला. यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजी केली. आणि नुकसान भरपाईची मागणी देखील केली.
मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या अन्य भागाला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह अवेळी होत असलेल्या गारांच्या पावसाने शेतातील पिकांची धुळधाण केली आहे. पशुधनाचे मोठे नुकसान केले आहे. नद्या ओढ्यांना पूर आला आहे. असेच विदारक चित्र बुलढाणा जिल्ह्यात उभे राहिले आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात मागील 4 दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. भर उन्हाळ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नदी-नाल्यांना पूर येत आहे. बुलढाणा तालुक्यातील धाडजवळील बाणगंगा नदीला मोठा पूर आला असून, नदीच्या प्रवाहात जनावरे देखील वाहून गेली आहे.
अमरावती जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.