Download App

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्वरित नुकसान भरपाई द्या, अनिल देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  • Written By: Last Updated:

नागपूर : अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्हात संत्रा व मोसंबीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा सर्व्हे करत तो राज्य सरकारला सादर सुद्धा करण्यात आला आहे. परंतु अदयाप देखील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यामुळे ही नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.

अतिवृष्टीने खरीपातील पिकांबरोबरच संत्रा आणि मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली होती. या नुकसानीचा सर्व्हे सुद्धा करण्यात आला आहे. परंतु संत्रा व मोसंबीला सर्व्हेमधून वगळण्यात आले होते. ही बाब राष्ट्रवादीचे नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जिल्हाधीकारी व कृषी अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली होती.

यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या काटोल येथील फळ संशोधन केंद्राचा सर्व्हे अहवाल तयार नसल्याचे लक्षात आले होते. तातडीने सलील देशमुख यांनी याविषयी संबधीत अधिकाऱ्यांची भेट घेवून नुकसानीचा सर्वे करुन तो अहवाल तयार करण्याची विनंती केली होती. अधिकाऱ्यांनी तातडीने सर्वे करुन तो अहवाल २९ सप्टेंबर २०२२ ला उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आला. यानंतर तो अहवाल नागपूर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता.

मोठया प्रमाणात नुकसान होवून देखील मदत न मिळाल्याने संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे बांग्लादेशने आयात शुल्कात मोठया प्रमाणात वाढ केल्यामुळे शिल्लक राहीलेल्या संत्रा व मोसंबीला भाव मिळत नाही. अशा या दुहेरी संकटातून संत्रा व मोसंबी उत्पादक जात आहे.

नागपूर जिल्हात संत्रा व मोसंबी हे मुख्य पीक आहे. यातुन जिल्हातील ग्रामीण भागात आर्थिक गाडा चालत असतो. यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून भरीव मदत ही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दयावी अशी, मागणी अनिल देशमुख यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

Tags

follow us