Download App

धक्कादायक! चंद्रपुरात 125 लोकांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू

Chandrapur Food Poisoning News : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माजरी गावात तब्बल 125 लोकांना विषबाधा झाली. महाप्रसाद खाल्ल्यानंतर या भाविकांना मळमळ, उलट्यांचा त्रास सुरू झाला. या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे तर सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या विषबाधा झालेल्यांत 6 पुरुष, 30 महिलांचा आणि काही लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! अकोल्यात शालेय पोषण आहारातून 10 विद्यार्थ्यांना विषबाधा; रुग्णालयात दाखल

सध्या देवीचे नवरात्र सुरू आहेत. यानिमित्त माजरी गावातील कालीमाता मंदिरात काल महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसाद खाल्ल्यानंतर मात्र अनेकांची तब्बेत खराब झाली. अनेकांना मळमळ, उलट्यांचा त्रास सुरू झाला. यानंतर या लोकांना लगेच वेकोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात अचानक रुग्णांची संख्या वाढल्याने येथील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली. औषधे, सलाईनची कमतरता होती. तसेच रुग्णालयात पुरेशा खाटाही नव्हत्या. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना पाठवा असे आम्हाला सांगितले गेल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे रात्रीच्या वेळी नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय गाठले. येथे उपचार घेणाऱ्या 69 जणांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.

धुळ्यात 20 भावी पोलिसांना जेवणातून विषबाधा; मैदानात सराव करताना उलट्या, मळमळ

महाप्रसादात वरण-भात, पोळी, भाजी आणि बुंदी या पदार्थांचा समावेश होता. या अन्नातील फक्त बुंदी खाणाऱ्यांनाही विषबाधा झाल्याने ही विषबाधा फक्त बुंदीद्वारेच झाली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे. तरीदेखील संपूर्ण तपासणी केल्यानंतरच विषबाधा नेमकी कशातून झाली याचं उत्तर मिळेल.

दरम्यान, याआधी बुलढाणा जिल्ह्यातही असाच विषबाधेचा प्रकार समोर आला होता. येथे एका गावात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मात्र, याद्वारे जवळपास 500 लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या महाप्रसादात भगर होती. भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या लोकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात ही घटना घडली.

follow us

वेब स्टोरीज