Download App

तुम्हाला किंमत चुकवावी लागेल; मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी तिसऱ्यांदा नक्षलवाद्यांची धमकी

  • Written By: Last Updated:

Dharmarao Baba Atram : काही दिवसांपूर्वी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांना नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा नक्षलवाद्यांकडून त्यांना धमकी देण्यात आली आहे. सूरजागड येथील लोहखाणीला (Surjagad Iron Mine) धर्मरावबाबा देत असलेल्या उघड समर्थनावरून ही धमकी देण्यात आली. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

सुरजागड येथे असलेल्या लोहखाणीत गेल्या दोन वर्षांपासून खनिज उत्खनन सुरू आहे. याला नक्षलवाद्यांनी विरोध केला आहे. या खाणींच्या उत्खननासाठी मंत्री धर्मरावबाबा आत्राम व त्यांचे जावई हेच जबाबदार आहेत, असा आरोप नक्षलवाद्यांनी केला आहे. धर्मरावबाबा आत्राम यांना त्याची किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी नक्षलवाद्यांनी दिली आहे. हे पत्र पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास याच्या नावे असून यात आत्राम यांचा जावई, त्यांचे भाऊ आणि कंपनीत काम करणाऱ्या काही लोकांची नावे आहेत.

Women Reservation Bill : ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला ओवैसीचा विरोध का? कारण आले समोर 

एटापल्ली तहसीलच्या गट्टा परिसरात पत्रके टाकून नक्षलवाद्यांनी ही धमकी दिली आहे. वर्षभरात आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून मिळालेली ही तिसरी धमकी आहे. नक्षलवाद्यांनी धर्मरावबाबा आत्राम यांना हिवाळी अधिवेशनादरम्यान आणि त्यानंतरही धमकी दिली होती. एटापल्ली तालुक्यातील सूरजगड येथे सुरू असलेल्या लोहखनिज उत्खननावरून ही धमकी दिली होती. त्यामुळे धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मरावबाबा आत्राम यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले होते. त्याअंतर्गत आत्राम यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

आता तिसऱ्यांदा नक्षलवाद्यांचं हे धमकीचं पत्र मिळाल्यानं पोलिस प्रशासनाने याचची गांभीर्याने दखल घेतली आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षेची आम्ही पूर्ण काळजी घेत असल्याचे सांगितले आहे. सध्या त्यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. नक्षलवाद्यांच्या धमकीच्या पत्राबाबत आम्ही तपास सुरू केला आहे, असं त्यांनी सांगितलं.

तर या धमकीला उत्तर देताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. सूरजगड प्रकल्पामुळे हजारो हातांना रोजगार मिळाला आहे. या प्रकल्पामुळं अनेक घरांमध्ये चुली पेटत आहे. जिल्ह्याचा विकास हेच माझे ध्येय आहे. म्हणूनच अशा धमक्यांकडे मी लक्ष देत नाही, असं आत्राम यांनी सांगितलं.

Tags

follow us