Ekanth Khadse : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्हीही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आताही नाथाभाऊंनी फडणवीसांवर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची राज्याच्या राजकारणात 2014 मध्ये ठळकपणे एन्ट्री झाली. त्यानंतरच राज्यातील राजकारण गढूळ झाले, असा आरोप खडसे यांनी केला. अकोला येथे खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या कॅबिनेट बैठकीवरील शासकीय खर्चावरूनही सरकारवर घणाघाती टीका केली.
ते पुढे म्हणाले, मी मागील 40 वर्षांपासून राज्याचं राजकारण पाहतोय. मी आता सातव्यांदा आमदार झालो आहे. मात्र, राजकारणाची पातळी 2014-15 पासून खाली गेली. 2019 नंतर ते प्रचंड खाली गेली. आधी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदेंसारखे लोक मुख्यमंत्री होते. या नेत्यांनी कधीच संयम सोडला नाही. पण, फडणवीस मुख्यमंत्री झाल्यालर राजाकारणाची दिशाच बदलली. यानंतरच सुडाचं राजकारण सुरू झालं. ईडी, सीबीआय, आयकर सारख्या संस्थांचा या सुडाच्या राजकारणासाठी वापर केल जाऊ लागला, असे खडसे म्हणाले.
सन 2014 आधी मीच विधानसभेत फडणवीस यांना माझ्या मागची जागा दिली होती. चर्चा होत असतानाही मीच त्यांना माझ्यापेक्षा जास्त वेळा बोलण्याची संधी दिली. त्यानंतरच्या काळात मात्र त्यांच्याकडून कुरघोडी करण्याचे अनेक प्रयत्न झाले. मला या एकाच गोष्टीचं दुःख आहे की ज्या माणसाला प्रदेशाध्यक्ष करण्यात मोठी मदत केली त्यामुळेच ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले. मात्र त्यांनीच माझा छळ करण्याची भूमिका घेतली. राज्याच्या राजकारणासाठी हे चांगले नाही, अशी टीका खडसे यांनी केली.
दरम्यान, आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. या बैठकीवर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या बैठकीवर ज्या पद्धतीने खर्च होत आहे त्यावरून राज्य सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. खडसे यांनीही हाच धागा पकडत सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे मंत्रिमंडळ सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत आहेत. तीन हजारांच्या थाळीत जेवताहेत. गाड्यांचा मोठा ताफा आहे. ही सरळ सरळ उधळपट्टीच आहे. याऐवजी शेतकऱ्यांना मदत करता आली असती, हे तर दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे, अशी टीका खडसे यांनी केली.
संजय राऊत पिंजऱ्यातला पोपट, मालक आला की टिव टिव करतो; रावसाहेब दानवेंची सडकून टीका