Sushma Andhare News : महाप्रबोधन यात्रेनंतर आता ठाकरे गटाकडून मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. विरोधकांना सडेतोडपणे उत्तर देण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या नेतृत्वाखाली आज बुलढाण्यातील सिंदखेडराजामधून या यात्रेला सुरुवात झाली आहे. राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी अभिवादन करुन यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून सुषमा अंधारे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.
नितीश कुमारांच्या बिहारी पॉलिटिक्सचे ‘इंडिया’ला धक्के; महाराष्ट्र-पंजाबात काँग्रेसचं गणित बिघडणार?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. राज्यातील विविध मतदारसंघात ठाकरे गट पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. याआधीही महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. महाप्रबोधन यात्राही सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. आत्ताही मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेचं नेतृत्व सुषमा अंधारे करणार आहे.
या यात्रेच्या माध्यमातून ठाकरे गटाकडून जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील 17 लोकसभा आणि 31 विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे. मुक्त संवाद यात्रेचा एकूण 830 किलोमीटर असणार आहे. यात्रेमध्ये विशेषत: राज्यातील महिला वर्गाचा समावेश करुन त्यांचेही प्रश्न समजून घेण्यात येणार असल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे. तसेच सिंदखेडराजामधून निघालेल्या या यात्रेचा समारोप मातोश्री येथे होणार असल्याचंही अंधारेंनी सांगितलं आहे.
मराठा आरक्षणावर नाराज झालेल्या छगन भुजबळांची सरकार समजूत काढणार…
दरम्यान, राज्यात एकीकडे लोकसभेचं वारे वाहु लागलेलं असतानाच ठाकरे गटाच्या नेत्यांवर ईडी कारवाईचं सत्र सुरु आहे. ठाकरे गटाचे मोठे नेते सूरज चव्हाण सध्या अटकेत आहेत. तर किशोरी पेडणेकर, रविंद्र वायकर यांचीही चौकशी सुरू आहे. केंद्रीय यंत्रणांकडून ही कारवाई सुरु असल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप केले जात आहे. या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला होता. अशातच आता ठाकरे गटाकडून मातृतीर्थ ते शिवतीर्थ या मुक्त संवाद यात्रेला सुरुवात करण्यात आल्याने या यात्रेकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.