नितीश कुमारांच्या बिहारी पॉलिटिक्सचे ‘इंडिया’ला धक्के; महाराष्ट्र-पंजाबात काँग्रेसचं गणित बिघडणार?

नितीश कुमारांच्या बिहारी पॉलिटिक्सचे ‘इंडिया’ला धक्के; महाराष्ट्र-पंजाबात काँग्रेसचं गणित बिघडणार?

Nitish Kumar : नितीश कुमार यांनी (Nitish Kumar) लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी बरोबरचा (Bihar Politics) दीड वर्षांचा राजकीय संसार मोडून भाजपशी मैत्री केली. भाजपच्या पाठिंब्यावर नवव्यांदा मुख्यमंत्रीही बनले. विरोधकांच्या इंडिया आघाडीत (INDIA Alliance) महत्वाची भूमिका असतानाही नितीश कुमार यांनी हे धाडस केले. त्यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसमध्ये (Congress) खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे नेते वरकरणी तसे दाखवत नसले तरी काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीला दणका बसलाच आहे. काँग्रेस, आरजेडीसह आघाडीतील मोठ्या पक्षांना असे वाटत होते की बिहार, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या राज्यात विरोधी पक्ष बळकट राहील. मात्र 2024 ची लढाई सुरू होण्याआधीच (Elections 2024) या राज्यांतून टेन्शन देणाऱ्या बातम्या येत आहेत.

हिंदी पट्ट्यात भाजप आधिक बळकट 

हिंदी पट्ट्यातील राज्यांत भाजप (BJP) आधीपासूनच मजबूत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकांनी यावर शिक्कामोर्तब सुद्धा केलं आहे. परंतु, या हिंदी पट्ट्यात बिहार (Bihar) एकमेव असे राज्य होते जिथून भाजपला आव्हान मिळू शकत होते. परंतु नितीश कुमार यांनी पलटी मारल्याने सगळा खेळच पालटला आहे. भाजप आणखी मजबूत झाला आहे. इतकंच नाही तर आता महाराष्ट्रानेही आघाडीची (Maharashtra) धाकधूक वाढवली आहे. येथे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. दक्षिण मुंबई मतदासंघावरून अशी अटीतटीची परिस्थिती निर्माण झाली होती की माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांना काँग्रेस सोडून शिंदे गटाची वाट धरावी लागली. आता काँग्रेससमोर सर्वात मोठे आव्हान हे आहे की निवडणुकीनंतरही ठाकरे गटाला आपल्यासोबत कसे ठेवता येईल.

Bihar Politics : नितीश कुमार नवव्यांदा बिहारचे CM; भाजपाच्या तिघांनी घेतली शपथ

जागावाटपात शरद पवार गटाचा दबाव  

आता तर काँग्रेसच्या रणनीतीकारांमध्ये अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत की ठाकरे केव्हाही भाजपसोबत जाऊ शकतो. अशी परिस्थिती निर्माण झालीच तर काँग्रेसलाच सर्वाधिक त्रास होणार आहे. यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Crisis) फूट पडली आहे. शरद पवार गटाचे संख्याबळ कमी झाले आहे तरी देखील त्यांना जागा मात्र जास्त हव्या आहेत त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.

पंजाब-बंगालचं राजकारण कठीणच 

काँग्रेसला बंगालमध्ये सुद्धा (West Bengal) वाटचाल अत्यंत कठीण झाली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची (Lok Sabha Election 2024) घोषणा केली आहे. डाव्या पक्षांचेही तळ्यात मळ्यात सुरू आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी स्वतंत्र निवडणूक लढणार आहे. तर उत्तर प्रदेशात अखिलेश यादव (Akhilesh Yadav) तडजोडीच्या मूडमध्ये दिसत नाहीत. या राज्यात त्यांनी काँग्रेसला 11 जागा देऊ केल्या आहेत. त्यांचा हा फॉर्म्युला काँग्रेसला मान्य नाही. यावर अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही मात्र वादाची ठिणगी पडली आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात आणखी काही पक्षांनी इंडिया आघाडीला सोडचिठ्ठी दिल्यास आश्चर्य वाटणार नाही.

‘माझ्या 5 मागण्या पूर्ण करा, मी राजकारण सोडतो’; केजरीवालांचं भाजपला थेट आव्हान

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube