Video recording of pilots’ breathalyzer tests mandatory : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर नागरी विमान वाहतूक क्षेत्रात महत्त्वाची घडामोड घडली आहे. Directorate General of Civil Aviation अर्थात डीजीसीएने वैमानिकांच्या मद्यप्राशन चाचणीसंदर्भातील नियम अधिक कडक करत नवे आदेश जारी केले आहेत. या आदेशांनुसार आता वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांच्या मद्यप्राशन चाचणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच हे रेकॉर्डिंग किमान सहा महिने जतन करून ठेवणेही आवश्यक असेल. या निर्णयामुळे विमान प्रवास अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली आणि अपघाताच्या कारणांबाबत विविध शंका उपस्थित करण्यात आल्या. विशेषत: वैमानिकाने मद्यप्राशन केले होते का, त्याची चाचणी झाली होती का आणि त्या चाचणीचे पुरावे उपलब्ध आहेत का, असे प्रश्न उपस्थित झाले. या पार्श्वभूमीवर डीजीसीएने नियम अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला.
सध्याच्या नियमानुसार वैमानिक आणि केबिन कर्मचारी यांची उड्डाणापूर्वी तसेच उड्डाणानंतर मद्यप्राशन चाचणी घेतली जाते. मात्र आता या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्डिंग सक्तीचे करण्यात आले आहे. जर चाचणीदरम्यान वैमानिक किंवा केबिन कर्मचारी मद्यप्राशन केल्याचे आढळले, अथवा चाचणीत अपयशी ठरले, तर त्याचा अहवाल 24 तासांच्या आत संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक असेल.
वर्ल्डकपमध्ये भारत-पाक पुन्हा भिडणार; सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
नव्या आदेशात शिक्षेच्या पातळ्याही स्पष्ट करण्यात आल्या आहेत. मद्यप्राशन चाचणीत दोषी आढळल्यास संबंधित वैमानिक किंवा कर्मचाऱ्यावर आर्थिक दंड, समुपदेशन किंवा निलंबन अशी टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाऊ शकते. तसेच ड्युटीपूर्वी किमान 12 तास मद्यप्राशन न करण्याचा नियम पुन्हा अधोरेखित करण्यात आला आहे.
दरम्यान, मनुष्यबळाच्या उपलब्धतेसंदर्भातही हालचाली सुरू आहेत. IndiGo या विमान कंपनीने लवकरच सुमारे एक हजार वैमानिकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षणार्थी वैमानिक, वरिष्ठ फर्स्ट ऑफिसर आणि कॅप्टन या पदांसाठी ही भरती होणार आहे. कंपनीच्या ताफ्यात ए-320 प्रकारातील विमानांची संख्या मोठी असल्याने त्या अनुषंगाने प्रशिक्षित वैमानिकांची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे.
एकूणच, अपघातानंतर उभ्या राहिलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने घेतलेले हे निर्णय विमान सुरक्षेला अधिक बळकटी देणारे ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
