जरांगेंचा उपयोग संपला, आता सरकारला त्यांना मारायचंय; राऊतांचा गंभीर आरोप

Manoj Jarange मनोज जरांगे पाटलांची लढाई आणि त्यांचा संघर्ष हा सत्ताधाऱ्यांच्या गळ्यातील फास बनला आहे.

Sanjay raut manoj jarange

Sanjay raut manoj jarange

Sanjay Raut On Manoj Jaraneg : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “मनोज जरांगे पाटील यांना सरकारला मारायचे आहे. त्यांचा संघर्ष आता सरकारच्या गळ्यातील फास बनला आहे. सरकारसाठी जरांगेंचा उपयोग संपला असून, त्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी वापर करून आता त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज बारावा दिवस आहे. २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे त्यांनी उपोषण सुरू केले आहे. सलग अनेक दिवस अन्न न घेतल्याने त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. सोमवारी रात्री प्रकृती बिघडल्यानंतर मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी सलाईन लावून घेण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, शरीरात अन्न न गेल्याने त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवत असून रक्तातील साखरेची पातळीही कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असताना सरकारने त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यांना वाऱ्यावर सोडणे ही अमानुष बाब आहे. सरकारने त्यांच्या उपोषणाचा आणि लढ्याचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर करून घेतला,” असा आरोप त्यांनी केला.

‘सरकारने जे करायचं होतं ते केलं’

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने आवश्यक ते निर्णय घेतल्याचे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असतील, तर तो त्यांचा निर्णय आहे. सरकारकडून आवश्यक ते प्रयत्न करण्यात आले असून त्यापुढे जाऊन त्यांचे समाधान करण्यासाठी सध्या कोणताही पर्याय नसल्याचे विखे-पाटील यांनी म्हटले होते. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सरकारची भूमिका आता अधिक कठोर होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे जरांगे पाटील हे कुणबी प्रमाणपत्रांच्या मागणीवर ठाम असून उपोषण मागे घेण्यास तयार नसल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

‘फडणवीसांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी’

ओबीसी किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असो, त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवावी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. “हा प्रश्न केवळ एका समाजाचा नसून राज्याच्या सामाजिक हिताशी संबंधित आहे. त्यामुळे सर्वपक्षीय चर्चा करून मार्ग काढला पाहिजे,” असे राऊत म्हणाले. पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणी, अमृता फडणवीस यांची गरब्यात मुस्लिम महिलांच्या सहभागाबाबतची भूमिका, पक्षांतरबंदी कायदा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य एकत्रीकरणासह विविध राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केले.

अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे स्वागत 

अमृता फडणवीस यांच्या मुस्लीम महिलांना गरब्यात येऊ द्यावे या भूमिकेचे मी स्वागत करतो. त्यांनी आपली भूमिका त्यांचे यजमान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगावी. मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील जे नवहिंदुत्ववादी टोळभैरव आहेत, त्यांनाही याची माहिती दिली पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो किंवा स्वातंत्र्याचा लढा असो, या सर्व लढ्यांमध्ये मुस्लिम समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. शाहीर अमर शेख यांच्यापासून असे अनेक लोक होऊन गेले, ज्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करले आहे. फडणवीस यांचे जे लाडके नवहिंदुत्ववादी आहेत, त्यांचे काउन्सेलिंग अमृता फडणवीस यांनी केले पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचेही काउन्सेलिंग केले पाहिजे असा सल्लाही राऊत यांनी यावेळी दिला.

Exit mobile version