Download App

Video : आव्हाडांनाही पडली भुरळ; काँग्रेस नेत्याच्या पक्षनिष्ठेचे केले तोंडभरून कौतुक..

Jitendra Awhad : कर्नाटकात भाजपला (Karnataka Election) चारीमुंड्या चीत केल्यानंतर काँग्रेसने सत्ता स्थापनेच्या दिशेने दमदार पावले टाकली आहेत. काँग्रेसने येथे मुख्यमंत्री पदाचा तिढाही सोडविला असून सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तर काँग्रेसच्या कर्नाटकच्या प्रचंड विजयात सिंहाचा वाटा उचलणारे डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) उपमुख्यमंत्री होणार आहेत. मुळातच त्यांच्या कार्यपद्धतीची अनेकांना भुरळ पडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील एक व्हिडीओ ट्विट करत शिवकुमार यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री पदाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोघांनीही दावा केला होता. दोघांतून एकाची निवड करणे काँग्रेस नेतृत्वासाठी कठीणच होते. तरी देखील पक्षश्रेष्ठींनी मॅरेथॉन बैठका घेत हा तिढा सोडविला. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर शिवकुमार यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर शिवकुमार यांनी प्रसारमाध्यमांना अत्यंत समर्पक शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, की मी नाराज नाही. अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे.

यावरून आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत शिवकुमार यांचे कौतुक केले आहे. आव्हाड म्हणाले, की या माणसाकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. त्याची बांधिलकी, त्याची निष्ठा.. तो ज्या प्रकारे पक्ष आणि नेत्यांच्या पाठिशी उभा आहे.. आजकाल दुर्मिळ गुण आहेत.

उद्या होणार शपथविधी, विरोधी पक्षांचे नेते येणार 

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर काँग्रेसने शपथविधीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या (शनिवार) सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह डी. के. शिवकुमार आणि अन्य काही जण शपथ घेतील. या कार्यक्रमासाठी काँग्रेसने देशभरातील भाजपविरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रण दिले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन आदी नेत्यांचा समावेश आहे.

 

Tags

follow us